पुणे, दि.१०: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेल्या संवादवारी उपक्रमातून राज्य शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियान आणि निर्णयांची माहिती प्रभावीपणे मिळत आहे. पालखी सोहळा समाप्तीनंतरही ‘संवादवारी…पाहो सुखाचा सोहळा’ हा उपक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राज्याच्या सर्व भागात राबविण्यात यावा अशी अपेक्षा इंदापूर येथे पालखीतळ परिसरात आयोजित प्रदर्शनाला भेट देणाऱ्या वारकऱ्यांनी व्यक्त केली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित संवादवारी उपक्रमांतर्गत ३० पॅनल असलेले प्रदर्शन, एलईडी व्हॅन व त्यावर नाट्यपथक, आकर्षक चित्ररथ, पथनाट्याद्वारे राज्य शासनाच्या विभागनिहाय योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आज (दि.१०जुलै) इंदापूर येथे पालखी तळ परिसरात प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महिला आणि ज्येष्ठ नागरिक एसटी बस प्रवास सवलत योजना, उज्ज्वल भविष्याचे संवर्धन, महाराष्ट्राच्या मातृभाषेचे जतन आणि संवर्धन, गतिमान प्रशासन, गुणवत्तापूर्ण शिक्षण; आदी विविध योजनांची माहिती असलेले माहिती फलक प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी वारकरी प्रदर्शनाला आवर्जुन भेट देतात आणि योजनांची माहिती जाणून घेत आहेत. प्रदर्शनाची वैविध्यपूर्ण मांडणी आणि सोप्या भाषेत मिळणाऱ्या माहितीमुळे प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
पालखी सोहळ्यासोबत असलेला चित्ररथही वारकऱ्यांसाठी आकर्षण ठरले आहे.अनेक ठिकाणी वारकरी चित्ररथासोबत छायाचित्र घेताना दिसत आहेत. वारीसोबत चालणाऱ्या एलईडी व्हॅनवरील मोठ्या पडद्यावर दृकश्राव्य चित्रफीतीच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली जाते. लोककला पथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी भजन, विठुनामाच्या गजरासोबत रंजक पद्धतीने शासकीय योजनांची माहिती दिली जाते. सोबतच स्वच्छता आणि आरोग्यविषयक माहितीपर संदेशही देण्यात येतात. त्यामुळे या पथकासभोवतीही वारकऱ्यांची गर्दी दिसून येते. विसाव्याच्या ठिकाणी थकवा दूर करताना वारकरी बांधवांचे मनोरंजनही होते आणि सोबत विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याने ‘संवादवारी’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
*हिराबाई रामदास दाभाडे,संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड*
लोककल्याणकारी योजनांची माहिती सोप्या भाषेत प्रदर्शनात दिली आहे. जनतेच्या उपयोगाचा उपक्रम आयोजनासाठी शासनाचे आभार.
*मुकुंद भालेकर, हसनापूर,जि.जालना*
प्रदर्शनामध्ये अनेक शासकीय योजनांची माहिती मिळाली. ज्येष्ठांना मोफत एसटी बस प्रवास योजना चांगली आहे.
*मीरा देवकर,दरेकरवाडी, शिरुर,जि.पुणे*
प्रदर्शनाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती तळागाळातील नागरीकांना होत आहे. समाजाचे मार्गदर्शन होत आहे.
०००