मुंबई, ८ डिसेंबर २०२३: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ही फॉर्च्युन ५०० व फुली इंटीग्रेटेड महाराष्ट्र एनर्जी कंपनी आणि भारतातील इलेक्ट्रिक वेईकल क्रांतीमध्ये अग्रणी असण्यासाठी ओळखली जाणारी कंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. (टीपीईएम) यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या सहयोगाच्या माध्यमातून बीपीसीएलचे व्यापक फ्यूएल स्टेशन्स नेटवर्क आणि टीपीईएमने रस्त्यांवरील टाटा ईव्हींमधून मिळवलेल्या माहितीचा फायदा घेत टाटा ईव्हीचे मालक वारंवार भेट देणाऱ्या ठिकाणी चार्जर्स उभारण्यात येतील. तसेच, बीपीसीएल ग्राहक अनुभवामध्ये वाढ करण्यासाठी चार्जर वापरासंदर्भात माहिती गोळा करेल.
टीपीईएम व बीपीसीएल यांच्यामधील या कराराचा टाटा ईव्ही मालकांच्या एकूण अनुभवामध्ये वाढ करण्याचा मनसुबा आहे आणि दोन्ही कंपन्या को-ब्रॅण्डेड आरएफआयडी कार्डच्या माध्यमातून सोईस्कर पेमेंट सिस्टम सादर करण्याच्या शक्यतेबाबत संशोधन देखील करत आहेत, ज्यामुळे टाटा ईव्ही वापरकर्त्यांना पेमेंट सुलभपणे करता येईल आणि देशातील अधिकाधिक व्यक्तींना इलेक्ट्रिक वेईकल्सचा अवलंब करण्यास प्रेरित करता येईल.
बीपीसीएलचे देशभरात २१,००० हून अधिक इंधन फ्यूएल स्टेशन्स आहेत आणि धोरण, गुंतवणूका व पर्यावरणीय ध्येयांना एकत्र करत शाश्वत भविष्याप्रती कटिबद्ध आहे. पुढील पाच वर्षांमध्ये कंपनीचा जवळपास ७,००० एनर्जी स्टेशन्समध्ये इलेक्ट्रिक वेईकल चार्जिंग स्टेशन्स स्थापित करण्याचा मनसुबा आहे. इलेक्ट्रिक वेईकल मालकांच्या रेंजबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बीपीसीएलने देशभरात ९० हून अधिक इलेक्ट्रिक वेईकल फास्ट चार्जिंग हायवे कॉरिडर्स सुरू केले आहेत, जे प्रमुख महामार्गांच्या दोन्ही बाजूस प्रत्येक १०० किलोमीटर अंतरावर फास्ट-चार्जिंग स्टेशन उपलब्ध असण्याची खात्री देतात. हे कॉरिडर्स विविध महामार्गांवर ३०,००० किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत पसरलेले आहेत, ज्यामधून सुधारित ईव्ही सोयीसुविधा व उपलब्धतेची खात्री मिळते.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना मत व्यक्त करत बीपीसीएलच्या रिटेलचे प्रभारी कार्यकारी संचालक संतोष कुमार म्हणाले, ”बीपीसीएल २०४० पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन संपादित करण्याच्या देशाच्या दृष्टीकोनाशी संलग्न राहण्याचा सतत प्रयत्न करत आहे. बीपीसीएल आमच्या ७००० समकालीन रिटेल आऊटलेट्सना एनर्जी स्टेशन्समध्ये रूपांतरित करण्याच्या ध्येयाकडे स्थिर गतीने वाटचाल करत आहे, जो शाश्वत उपक्रमांना पाठिंबा व प्राधान्य देण्यासाठी सर्वसमावेशक डिकार्बनायझेशन धोरणाचा भाग आहे. बीपीसीएलने महामार्गांवर फास्ट चार्जिंग स्टेशन्सचे मोठे नेटवर्क स्थापित केले आहे. ईव्ही हे सहयोगाचे क्षेत्र आहे आणि टीपीईएमसोबतचा सहयोग बीपीसीएल व टीपीईएमच्या ईव्ही स्तराला नव्या उंचीवर घेऊन जाईल. हा सहयोग ईव्ही ग्राहकांना खरा आनंद देईल.”
टीपीईएमने भारतीय ऑटोमोबाइल बाजारपेठेत स्वत:ची छाप पाडली आहे आणि सध्या ई-मोबिलिटी क्षेत्रातील बाजारपेठेत ७१ टक्क्यांहून अधिक मोठा वाटा आहे. रस्त्यावर ११५,००० हून अधिक टाटा ईव्ही धावत आहेत, जेथे ७५ टक्क्यांहून अधिक वेईकल्स प्रायमरी वेईकल्स म्हणून वापरल्या जात आहेत. ज्यामुळे टीपीईएम भारतातील इलेक्ट्रिक वेईकल क्षेत्रात अग्रस्थानी आहे.
टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि. आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले, ”भारतातील शहरांमधील खालावत असलेला हवेचा दर्जा सुधारण्यासाठी ईव्हीचा अवलंब अनिवार्य आहे. अधिकाधिक पसरलेल्या व विश्वसनीय चार्जिंग पायाभूत सुविधा भारतातील ईव्ही अवलंबतेला गती देण्यासाठी प्रमुख उत्प्रेरक ठरतील. भारतात चार्जिंग इकोसिस्टम विकसित करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेशी बांधील राहत आम्हाला बीपीसीएलसोबत आमच्या धोरणात्मक सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. या सहयोगाचा भारतातील ई-मोबिलिटीप्रती प्रवासाला गती देण्याचा मनसुबा आहे. या सहयोगात्मक भागीदारीमधून सकारात्मक परिवर्तनाला चालना देण्याप्रती, तसेच वाढत्या ईव्ही ग्राहकवर्गासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याप्रती आमचा संयुक्त दृष्टीकोन दिसून येतो. टीपीईएमची ईव्ही वापरासंदर्भातील अद्वितीय माहिती आणि बीपीसीएलचे देशभरातील व्यापक नेटवर्क यांचा या सहयोगाला फायदा होईल. या सहयोगामध्ये देशातील चार्जिंग पायाभूत सुविधा क्षेत्राला नवीन आकार देण्याची क्षमता आहे.”
ईव्हींची संपूर्ण क्षमता समजण्यासाठी आणि ईव्ही अवलंबतेला गती मिळण्यासाठी सक्षम चार्जिंग इकोसिस्टम निर्माण करणे महत्त्वाचे आहे. जगभरातील केस स्टडीजमधून निदर्शनास येते की, ईव्ही अवलंबतेला गती देण्यासाठी सर्वव्यापी व सोईस्कर चार्जिंग पायाभूत सुविधा आवश्यक आहे. चार्जिंग पायाभूत सुविधेमध्ये वाढ झाल्यास ईव्ही अवलंबेमध्ये अपवादात्मक वाढ होईल.