पुणे, दि. २३ : राज्यात २१ व्या पशुगणनेस १ सप्टेंबरपासून आरंभ होत असून त्या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिली आहे.
या कार्यशाळेस केंद्र शासनाच्या सांख्यिकी विभागाचे सांख्यिकी सल्लागार जगत हजारिका, संचालक व्ही. पी. सिंह, केंद्रीय पशुसंवर्धन विभाग संचालक बी. पी. मिश्रा, प्रधान शास्त्रज्ञ डॉ. संजीव सिंह यांच्यासह राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित राहून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेमध्ये केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांचेकडून महाराष्ट्र राज्यातील तसेच दमण व दिव आणि दादर नगर हवेली केंद्रशासित प्रदेशांतील राज्य पशुगणना अधिकारी, जिल्हा पशुगणना अधिकाऱ्यांना २१ व्या पशुगणनेचे विकसित मोबाईल ॲप, वेब आधारित आणि डॅशबोर्ड निरीक्षण याविषयी प्रशिक्षण देणार आहेत,
महाराष्ट्र राज्य हे पशुधनाच्या बाबतीत संपन्न राज्य आहे. पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून देश- राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये याचे लक्षणीय योगदान आहे. शासनाला नियोजनासाठी पायाभूत सांख्यिकी माहितीची अत्यंत आवश्यकता असते. अशी पायाभूत माहिती ही गणनेच्या स्वरुपात गोळा केली जाते. पशुधनांच्या निरंतर विकासासाठी चांगल्या योजना आखण्यासाठी पशुगणना महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.
देशात सन १९१९-२० पासून पशुगणनेस सुरुवात झाली. तेंव्हापासून दर ५ वर्षांनी पशुगणना घेण्यात येत आहे. सन २०१९ मध्ये २० वी पशुगणना संपन्न झाली. या पशुगणनेमध्ये प्रथमच प्रजाती व ग्रामीण आणि नागरी क्षेत्रनिहाय पशुधनाची आकडेवारी गोळा करण्यात आली. २० व्या पशुगणनेच्या अहवालानुसार राज्यामध्ये एकूण ३ कोटी ३० लाख ८० हजार इतके पशुधन असून मागील पशुगणनेच्या तुलनेत १.८३ टक्क्यांची वाढ झालेली आहे. पशुधनामध्ये देशामध्ये महाराष्ट्र राज्य ७ व्या क्रमांकावर आहे. तसेच कुक्कुट व कुक्कुटादी पक्षी यामध्ये ५ व्या क्रमांकावर आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाचे सहआयुक्त प्रकाश आहिरराव यांनी दिली आहे.