पुणे : साडी हा महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. गरजू व निराधार महिलांना अशा प्रकारे भेटवस्तू देणे अत्यंत स्तुत्य आहेत. मात्र, केवळ साहित्य वाटप करण्यापुरते मर्यादित न राहता महिलांचे कायमस्वरूपी सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने आपण विचार करायला हवा, असे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.
शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट, पुणेच्या वतीने २०० गरजू व निराधार महिलांना साडी वाटप आणि स्नेहभोजनाचे आयोजन आले. एकूण ८० हजार रुपये किमतीच्या साड्यांचे वाटप करण्यात आले. मंडईतील बुरुड आळी येथे म्हसोबा मंदिरासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार मोहन जोशी, कोहिनूर उद्योग समूहाचे संस्थापक कृष्णकुमार गोयल, पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सुर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, सारिका निंबाळकर, सामाजिक कार्यकर्त्या अलका गुजनाळ आदी मान्यवर उपस्थित होते. वेंकिज उद्योग समुहाचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मोहन जोशी म्हणाले, पूर्वी महिला म्हणजे फक्त घरकाम हेच समीकरण दिसत होते. पण आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षमपणे कार्य करीत देशाचे नेतृत्व करीत आहेत. समाजातील वंचित भगिनींसाठी या ट्रस्टने साडी वाटपाचा उपक्रम राबविला. त्यांना मदतीचा हात दिला आहे. समाजात मदत करणारे अनेक दानशूर आहेत.परंतु त्यांची मदत योग्य घटकापर्यंत पोहचविण्याचे काम ही संस्था करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेमंत रासने म्हणाले, समाजात चारच जाती आहे. गरीबी, महिला, युवा आणि शेतकरी या चार जाती सक्षम झाल्या, तर देश प्रगती करेल. हाच उद्देश समोर ठेवून ही संस्था काम करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
निवृत्ती जाधव म्हणाले, कष्टकरी व्यावसायिकांसाठी जंबो छत्री वाटप, पोलीस कर्मचाऱ्यांना बॅरिगेटची सोय, कर्करोग झालेल्या रुग्णांना मदत, विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप, वंचित मुलांसाठी स्नेहभोजन, महिलांना सक्षम करण्यासाठी महिला बचत गट स्पर्धा अशा समाजातील प्रत्येक घटकासाठी विविध विधायक उपक्रम राबविले जातात. हाच उद्देश समोर ठेवून महिलांना साडी वाटपाचा विधायक उपक्रम राबविण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.