पुणे,25 फेब्रुवारी २०२५ : लोणी येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक एमआरआय सेवांचे आज उद्घाटन करण्यात आले. संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व प्रख्यात अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ.पराग संचेती,महाराष्ट्र आर्थोपेडिक असोसिएशनचे प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.नारायण कर्णे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,तर माईर्स एमआयटी – डब्ल्यूपीयूच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्य,सह सरसचिव व विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक डॉ.आदिती कराड विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी विश्वराज हॉस्पिटल येथील रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.अजितेय ताम्हाणे,अस्थिरोग तज्ञ डॉ प्रमोद सुर्वे, डॉ.रामप्रसाद धरनगुट्टी व सहाय्यक व्यवस्थापक डॉ तबरेज पठाण,वैद्यकीय अधिक्षक डॉ.सचिन कातकडे, आर्थोपेडिक सर्जन डॉ.संपत डुंबरे-पाटील,डॉ सचिन आबणे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर सीएमईचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ.पराग संचेती यांनी गुडघ्यातील ऑस्टियोआर्थरायटिसच्या समस्या आणि या क्षेत्रात सध्याच्या काळात झालेली प्रगती या विषयावर सादरीकरण केले.
याप्रसंगी बोलताना संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व प्रख्यात अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ.पराग संचेती म्हणाले की, विश्वराज हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रेडिओलॉजीचे उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे. एमआरआय स्कॅन मुळे हाडांच्या भोवती असणारे स्नायू,अस्थिबंधन,उतींना झालेली दुखापत याची आतील तपशीलवार माहिती घेऊन समस्या शोधता येते. अचूक निदान केल्यामुळे रूग्णावर करण्यात येणारी उपचार प्रक्रिया सोपी होऊ शकते.कंबरेच्या,गुडघ्याच्या,मानेच्या विकारांसाठी एमआरआय मध्ये मिळालेल्या अचूक माहितीमुळे रुग्णांवर योग्य ते उपचार करू शकतो.
महाराष्ट्र आर्थोपेडिक असोसिएशनचे प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.नारायण कर्णे म्हणाले की, या अत्याधुनिक सुविधांमुळे हडपसर व आसपासच्या परिसरातील नागरिकांना उपचार मिळण्यात मदत होईल.
विश्वराज हॉस्पिटल येथील रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.अजितेय ताम्हाणे म्हणाले की, या अत्याधुनिक एमआरआय उपकरणामुळे प्रतिमांमध्ये अधिक स्पष्टता व निदानामध्ये अचूकता साधता येणार आहे. स्कॅन प्रक्रियेला तुलनेने कमी वेळ लागत असल्याने रूग्णांसाठी ही सेवा अतिशय सुलभ होईल. अत्याधुनिक उपकरण असल्यामुळे शरीरातील असामान्य बाबी अधिक स्पष्टतेने दिसून येतात,ज्यामुळे निदान आणि उपचाराचे परिणाम चांगले दिसून येतात.