*
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्राहक पेठेतर्फे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या सहयोगाने ‘माझी जन्मठेप’ अभिवाचनाचा रंगमंचीय नाट्य अविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे अभिवाचन नाटक होणार आहे. नाटकासाठी विनामूल्य प्रवेश असून मोफत प्रवेशिका टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठेत मिळणार आहेत, अशी माहिती सूर्यकांत पाठक यांनी दिली.
या कार्यक्रमात नरेंद्र सदाशिव घोणे यांचा विशेष सन्मान राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या अभिवाचन नाट्यविष्काराची संकल्पना अनंत वसंत पणशीकर यांची आहे. तरी दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर, संकलन अलका गोडबोले, नेपथ्य संदेश बेंद्रे, शब्दाचार मार्गदर्शन सुभाष सावरकर, संगीत मयुरेश माडगावकर यांचे आहे. जान्हवी दरेकर, मुग्धा गाडगीळ बोपर्डीकर, गौरव निमकर, समर्थ कुलकर्णी, शंतनू अंबाडेकर, नवसाजी कुडव हे कथन कलाकार आहेत.
‘माझी जन्मठेप’ हा ग्रंथ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र आहे. सावरकरांचे कार्य, प्रखर राष्ट्रवादी, भाषा प्रभुत्व, त्यांनी भोगलेले कष्ट, कारावास हे तरुण पिढीला कळणे गरजेचे आहे. या अभिवाचनाचा नाट्य आविष्कारातून नक्कीच ते प्रभावी पणे पोहोचेल.