‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर २०२३ दरम्यान ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून, वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. पुणे पुस्तक महोत्सवात जास्तीत जास्त वाचकांनी भेट देऊन खरेदी करावी, यासाठी कोथरुड मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला १०० रुपयाचे कुपन देण्याचा निर्णय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, पण त्यासोबतच वाचनप्रेमी मंडळींचे ही शहर आहे. मात्र, त्यामुळे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यासाठीच ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानात १६ ते २४ डिसेंबर २०२३ दरम्यान सकाळी ११ ते सायं. ८ या वेळेत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवामध्ये राष्ट्रीय कीर्तीच्या प्रकाशकांबरोबरच इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराथी, कन्नड अशा देशभरातील २२ विविध भाषांमधील पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच या महोत्सवात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रदर्शनीचा देखील समावेश असणार आहे. त्यामुळे या पुस्तक प्रदर्शनाला जास्तीत जास्त पुणेकरांनी भेट द्यावी; यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील पुढाकार घेतला आहे.
पुणे पुस्तक महोत्सवात कोथरुडकरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पुस्तके खरेदी करण्यासाठी विशेष योजना राबविण्याचा निर्णय नामदार पाटील यांनी घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत कोथरुड मधील वाचन प्रेमी मंडळींनी ‘पुणे पुस्तक महोत्सावा’स भेट देऊन प्रत्येक व्यक्तीला पुस्तक खरेदीसाठी १०० रुपयांचे डिस्काऊंट कुपन दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात पुस्तके खरेदी करुन, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
सदर पुस्तक खरेदीचे कुपन दिनांक १६ ते २२ डिसेंबर दरम्यान नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुड, बाणेर मधील जनसंपर्क कार्यालयात सकाळी ११ ते ६ वेळेत उपलब्ध असणार आहेत. यासाठी नागरिकांना आधार कार्डची झेरॉक्स प्रत द्यावी लागणार आहे.
दरम्यान, पुण्यात होत असलेल्या अभिनव उपक्रमांमध्ये ‘शांतता, पुणेकर वाचत आहेत,’ हा ऐतिहासिक उपक्रम देखील होणार आहे. दिनांक १४ डिसेंबरला दुपारी १२ ते १ या वेळेत एक तास पुणेकरांनी आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन करायचे, असे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील हे देखील सहभागी होणार असून, सर्व पुणेकरांनी ही वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी १४ डिसेंबरच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन नामदार पाटील यांनी केले आहे.