पुणे,दि. १२ डिसेंबर: अभिनेता राजकपूर यांच्या जन्म शताब्दी निमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व माईर्स एमआयटी, पुणे यांच्यातर्फे १४ डिसेंबरपासून कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. उद्घाटन समारंभ १४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ ते ६ या दरम्यान होणार आहे. यावेळी मुंबई येथील ‘टयूनिंग फोक्स’ या विशेष ग्रूपच्या माध्यमातून राजकपूर यांच्या चित्रपटावरील गीत आणि संगीताचे सादरीकरण केले जाणार आहे. या ग्रूपचे प्रमुख ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. अनिल ब्रॉड्यू असून यामध्ये मुंबईचे सर्व ज्येष्ठ डॉक्टर्स आणि सर्जन यांचा समावेश आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीकडून देण्यात आली आहे.
कार्यक्रमात लाइव म्यूझिक बरोबरच राज कपूर यांच्या जीवनावर आधारित शॉर्ट फिल्म दाखविण्यात येणार आहे. माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड यांच्या संकल्पनेतून लोणीकाळभोर येथे राजकपूर मेमोरियल ची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय चित्रपट सृष्टीला अभिनेता राजकपूर यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांचे हे योगदान सर्वसाधारण जनतेला कळावे या उद्देशाने कार्यक्रम होणार आहे. तसेच दूरदर्शनचे माजी संचालक व विश्वशांती चॅनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मुकेश शर्मा हे संपूर्ण वर्षभर ‘भारतीय सिनेमाचा सुवर्णयुग’ या विषयावर विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करतील.
या संदर्भात विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी सांगितले की, ” संगीताच्या साधनेतून आत्मदर्शन घडावे या उदात्त हेतूने संस्थेने राजबाग येथे राजकपूर यांचे स्मारक उभारले आहे. राजकपूर यांच्या चित्रपटांचा अभ्यास केला तर असे दिसून येते की त्यांनी सतत समाजप्रबोधनात्मक संदेश दिलेला आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटातील संदेश, संवाद आणि विषय हे भावी पिढीवर संस्कार करणारे आहेत. हे स्मारक भारतीय संस्कृती आणि कला जगासमोर आणण्याचे मोठे साधन आहे. ”
डॉ. मुकेश शर्मा म्हणाले, ” राजकपूर यांच्या कर्मभूमीत डॉ. विश्वनाथ कराड यांनी उभारलेल्या जागतिक शैक्षणिक संकुलनातून चित्रपट सृष्टीतील सुवर्ण काळाचे दर्शन संपूर्ण वर्षभर घडविण्यात येणार आहे. येथून राजकपूर यांचे समग्र जीवनदर्शन व भारतीय संस्कृतीचा व तत्वज्ञानाचा संदेश जगभर पोहचविला जाईल.”
कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय सिनेजगतातील प्रसिद्ध अभिनेते स्व. राजकपूर , स्व. दिलीप कुमार आणि स्व.देवानंद यांच्या स्मृतींना उजाळा दिला जाईल. अभिनेत्री वैजंतीमाला, माला सिन्हा आणि वहिदा रहमान यांचा सिनेसृष्टीतील कार्य. तसेच स्व.नर्गीस, स्व.मधुबाला, स्व. मिनाकुमारी व मराठी चित्रपटसृष्टी आपल्या अभिनयाने गाजविणार्या अभिनेत्री स्व.सुलोचना, स्व.जयश्री गडकर, अभिनेता स्व.राजा परंजपे व अन्य कलाकार यांचा सिनेसृष्टीतील सुवर्ण योगदानाचा इतिहास सांगितला जाणार आहे.
राजकपूर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त १४ डिसेंबरपासून एमआयटी डब्ल्यूपीयूत वर्षभर कार्यक्रम भारतीय अभिजात संगीत संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न
Share with
Tagged in :