कॉक्लिअर इम्प्लांट उपक्रमामुळे 2023 मध्ये 178 लहान मुले मुख्य प्रवाहात येण्यासाठी सज्ज
पुणे,13 डिसेंबर 2023 : केईएम हॉस्पिटलमधील बिग इअर्स विभागातर्फे कॉक्लिअर इम्प्लांट आणि त्यानंतर पुर्नवसन कार्यक्रम पूर्ण केलेल्या मुलांसाठी बिग इअर्स ग्रॅज्युएशन सेरेमनी हा विशेष वार्षिक कार्यक्रम 15 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी ऐकणे आणि बोलण्याच्या प्रशिक्षणासह एकूण 178 मुलांनी हा कार्यक्रम पूर्ण केला आहे.आजवर एकूण 641 मुलांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे.बिग इअर ग्रॅज्युएशन सेरेमनीमध्ये जवळजवळ सामान्यांसारखे संवाद आणि भाषा कौशल्य विकसित झालेल्या आणि मुख्य प्रवाहात जाण्यास सज्ज असलेल्या मुलांचा समावेश आहे.या मुलांना हॉस्पिटलच्या टीमकडून सतत साहाय्याची आता गरज नाही.
2006 मध्ये कॉक्लिअर इम्प्लांट क्लिनिक स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या व बिग इअर्स विभागाच्या प्रमुख डॉ.निलम वेद म्हणाल्या की, हा अनोखा उपक्रम ऐकण्याच्या समस्यांना लवकर ओळखणे,निदान करणे आणि उपचार सुरू करण्यावर भर देतो. ऐकण्याच्या समस्या असलेल्या लहान मुलांसाठी बिग इअर्स तर्फे विविध प्रकारच्या निदान चाचण्या,श्रवण यंत्र,स्पीच थेरपी,समुपदेशन आणि कॉक्लिअर इम्प्लांटस या सर्व सेवा प्रदान केल्या जातात.कॉक्लिअर इम्प्लांट प्रक्रियेनंतर मुलांना ऑडिओलॉजिस्टस,थेरपीस्ट,स्पीच आणि लँग्वेज पॅथोलॉजिस्टस आणि शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली एक पुनर्वसन कार्यक्रम प्रदान करण्यात येतो. त्याअंतर्गत कुटुंबाला योग्य सल्ला देखील दिला जातो.आमच्याकडे येणार्या 98 टक्के कुटुंबांना हे तंत्रज्ञान परवडण्यासारखे नसल्याने गेली 18 वर्षेै आम्ही अनेक मुलांना आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.ही एक आव्हानात्मक बाब असून केईएम हॉस्पिटलमधील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम व समर्पितता कौतुकास्पद आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, पदवीदान समारंभ हा सहसा शैक्षणिक परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असते,मात्र हा कार्यक्रम एक विशेष प्रकारचा आहे.मुलांना यापुढे इतरांसारखेच सामान्य व चांगले आयुष्य मिळेल हा आनंद या कार्यक्रमातून आम्ही साजरा करतो.
दरवर्षीप्रमाणे सर्वांकडून मिळालेल्या सहाय्याबाबत कृतज्ञता म्हणून मुले एक खास नृत्य सादर करतात.
केईएम हॉस्पिटलचे वरिष्ठ उप वैद्यकीय प्रशासक डॉ.मधुर राव म्हणाले की, हा आमच्या सर्वांसाठी एक आनंदाचा क्षण आहे,कारण कॉक्लिअर इम्प्लांट आणि त्यानंतर पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण केलेल्या मुलांना एक चांगले जीवनमान मिळू शकेल. बिग इअर्स हा उपक्रम आम्ही यापुढेही सुरू ठेऊन गरजू मुलांपर्यंत पोहचत राहू.
केईएम हॉस्पिटल पुणेच्या प्रशासक शिरीन वाडिया म्हणाल्या की,या एकात्मिक दृष्टीकोन असलेल्या उपक्रमामुळे समाजातील सर्व स्तरातील अनेक मुलांना एक चांगले जीवनमान मिळाले आहे.मुलांना इतरांसारखेच सामान्य व चांगले आयुष्य मिळणे यासारखा दुसरा आनंद नाही. बिग इअर्स क्लिनिकच्या संपूर्ण टीमचे मी अभिनंदन करते.
विभागप्रमुख डॉ.नीलम वेद यांच्या नेतृत्वाखाली बिग इअर्सच्या टीममध्ये वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा चव्हाण मांढरे, ईएनटी शल्यचिकित्सक डॉ.अजय कोठाडिया आणि डॉ.निखिल गोखले,ऑडिओलॉजिस्ट राजेश निकम, आशुतोष कुमार दुबे व अनिरुध्द काटकर, ऑडिटरी वर्बल थेरपिस्ट कल्याणी साळवे व प्रियांका एंदाल,विशेष शिक्षक श्वेता जहागीरदार,स्पीच लँग्वेज थेरपिस्ट कृतिका गजणे, पलाल जुलानिया, रामेश्वरी सर्जे आणि सिया थॉमस यांचा समावेश आहे.