शालेय मुलांचे आव्हानात्मक वर्तन हाताळण्याबाबत केईएम हॉस्पिटल पुणे येथे कार्यशाळा संपन्न

तारां कित Avatar

पुणे, 14 डिसेंबर २०२३ : केईएम हॉस्पिटल पुणे येथील टीडीएच रिहॅबिलिटेशन अँड मॉरिस चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटर तर्फे पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे आव्हानात्मक वर्तन हाताळणे या विषयावर अर्धा दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सामान्य वर्तनविषयक आव्हाने, सामाजिक संवादामध्ये येणाऱ्या समस्या,अध्ययन अक्षमता,अस्वस्थता, अतिचंचलता आणि विध्वंसक वर्तणूक,शाळेमध्ये वर्तनविषयक समस्या हाताळणे इत्यादीं विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेत केईएम हॉस्पिटल पुणे येथील प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ.सुधा चौधरी यासंह डॉ.शर्मिला पाटील आणि मानसोपचारतज्ञ बिंदू पटनी, डॉ.उज्वल नेने, अमृता भालेराव,माधवी देशपांडे, ऐश्वर्या भावे यांनी वरील विविध विषयांवर शिक्षकांशी, समुपदेशक तसेच स्पेशल एज्युकेटर्सशी संवाद साधला. या कार्यशाळेचे नियोजन ऋचा मुळे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यांनी केले. पुण्यातील प्रसिद्ध पुर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेतील ६० पेक्षा अधिक शिक्षक, समुपदेशक, स्पेशल एज्युकेटर या कार्यशाळेत उपस्थित होते.

डॉ.सुधा चौधरी म्हणाल्या की, विकासात्मक अक्षमता असलेल्या जसे की ऑटीझम, अध्ययन अक्षमता(लर्निंग डीसेबलिटी), स्पीच लँग्वेज डिसऑर्डर असलेल्या मुलांचे आव्हानात्मक वर्तन हाताळणे ही बाब शिक्षकांसाठी अवघड असते. याचे कारण म्हणजे वेगवेगळ्या विकारांबद्दल आणि वर्णुकीबाबत शिक्षकांमध्ये असणारा जागरूकतेचा अभाव. शिक्षकांना अशा प्रकारचे विकार ओळखणे, मुलांच्या समस्या समजून घेणे आणि ते हाताळणे गरजेचे असून यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे, जेणे करून विकासात्मक अक्षमतांचे लवकरात लवकर निदान होऊन त्यावर त्वरित उपचार केले जातील

मेंदूच्या विकासाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो,त्यामुळे अशा प्रकारच्या समस्या लवकर ओळखून उपचार सुरू केले पाहिजे,असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले.या बहुआयामी उपचारांमध्ये (मल्टीमोडल ट्रीटमेंट) डेव्हलपमेंटल पेडिट्रिशियन, बाल मानसोपचारतज्ञ, ऑडिओलॉजिस्ट,स्पीच थेरपीस्ट व ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यांचा समावेश असतो.शिक्षक आणि पालकांची भूमिका यामध्ये महत्त्वाची असून लवकर लक्षणे ओळखणे गरजेचे आहे. त्यामुळे ही कार्यशाळा त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली.

टीडीएच रिहॅबिलिटेशन अँड मॉरिस चाईल्ड डेव्हलपमेंट गेल्या 44 वर्षांपासून कार्यरत असून एकाच छताखाली अशा समस्यांसाठी सर्व निदान व उपचारात्मक सेवा देत आहे.

Tagged in :

तारां कित Avatar