पुणे, दि. ६ ऑक्टोबर २०२५ : “कला सर्वांगीण समर्पणाची अपेक्षा करते. कला आणि कलाकार, यांना एकमेकांशिवाय अस्तित्व नसावे, इतकी एकरूपता ती मागते. तेव्हाच कलाकार ही संज्ञा सार्थ ठरते. शमाताई अशा संपूर्ण समर्पित कलाकार आहेत”, असे गौरवोद्रार ज्येष्ठ कथक नर्तक, नृत्यगुरु पद्मश्री डॉ. पुरू दधीच यांनी काढले. शमाताईंची समर्पित नृत्ययात्रा निरंतर सुरू राहो, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ कथक गुरु शमा भाटे यांच्या ७५ व्या वर्षांतील पदार्पणानिमित्त पुण्यातील ‘नादरूप’ कथक संस्थेच्या वतीने त्यांचा सांगीतिक प्रवास उलगडणारा ‘अमृतोत्सव’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पद्मश्री डॉ. दधीच यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ संगीतकार आणि गायक पं. हृदयनाथ मंगेशकर, तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर आणि उत्सवमूर्ती विदुषी शमा भाटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गणेश कला क्रीडा मंच येथे हा सोहळा साजरा झाला. नृत्य आणि कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर कलावंत यावेळी उपस्थित होते. ज्येष्य़ नृत्यांगना डॉ. सुचेता भिडे चापेकर, विदुषी मनीषा साठे, पद्मश्री पं. विजय घाटे, पं. अरविंदकुमार आझाद, पं. रघुनंदन पणशीकर, पं. शौनक अभिषेकी, पं. अतुलकुमार उपाध्ये, विदुषी स्वाती दैठणकर अशा अनेक कलाकारांचा त्यात समावेश होता.
कृष्णपूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. विश्वस्त राजेंद्र जोशी, अजय बदामीकर, विवेक देशपांडे यांनी स्वागत केले. डॉ. दधीच पुढे म्हणाले, “१९७६ पासून मी शमाताईंशी परिचित आहे. त्यांचा कलाप्रवास पाहत आहे. कलेप्रती शमाताईंचे समर्पण दुर्मिळ आहे. काया-वाचा- मनाने त्या कलेप्रती समर्पित आहेत. असे समर्पण ही कठीण साधना असते, हे मी अनुभवाने सांगू शकतो. ही साधना शमाताईंनी केली आहे. शिष्यात् इच्छेत् पराजयम्, असे वचन आहे. त्याचे सार्थक त्यांना लाभावे आणि त्यांचा कलाप्रवास अथक सुरू राहावा”.
तालयोगी पं. सुरेश तळवलकर म्हणाले, “शमाताईंचा कलाप्रवास मी जवळून पाहिला आहे. आपल्याला एखादी गोष्ट येत नाही, हे समजणे, हीच फार मोठी गोष्ट असते. कलेप्रती शरणभाव, भक्ती, परिश्रमांची तयारी, शिस्त, निष्ठा असे गुण ज्याच्यापाशी असतील, त्यालाच हे जमते. लयीच्या नेमकेपणाचे संस्कार करून घेण्यासाठी, शमाताईंनी कठोर साधना केली आहे. कथक नृत्य शास्त्रीय रचनांसह, वाद्यांसह, कर्नाटक संगीतासह, पाश्चात्त्य संगीतासह कसे दिसेल याचा विचार त्यांनी कथकची प्रेरणा कायम ठेवत सातत्याने केला आहे. कथकचे आधारतत्त्व अबाधित ठेवून कित्येक नाविन्यपूर्ण प्रयोग त्यांनी केले. यासाठी समर्पण, निष्ठा, श्रद्धा लागते. विद्यार्थ्याचा शागीर्द, मग कलाकार, शिक्षक, गुरु आणि आचार्य असा शमाताईंचा हा कलाप्रवास सदैव सुरू राहो.”
पं. हद्यनाथ मंगेशकर म्हणाले, “शमाताईंचा अमृत महोत्सव ही आनंदाची गोष्ट आहे. त्या अतिशय थोर कलाकार आहेत. ५० वर्षांपूर्वी लतादीदींना घेऊन मीरेच्या विराण्यांची ‘चाला वाही देस’ ही ध्वनिमुद्रिका केली होती. त्याच रचनांवर शमाताईंनी शिष्यांकडून याच शीर्षकाचे अतिशय उत्तम सादरीकरण केले होते. अवघ्या ४ आणि ६ मात्रांमध्ये गिनती किती विविध प्रकारे करता येते, याचे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी पेश केले होते. तो अतिशय उत्तम असा प्रयोग मला आठवतो”, असे ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “शमाताईंचा परिचय तुलनेने नवा आहे, पण त्यांचे कलाकर्तृत्व माहिती आहे. गुरु रोहिणी भाटे यांच्या नावाने नृत्यमहोत्सव सुरू केला, त्यानिमित्ताने आमचा परिचय झाला. त्यांनी केलेली कलेची सेवा, यापुढेही सुरू राहावी आणि रसिकांना आनंद देत राहावी”.
मनोगत मांडताना शमाताई म्हणाल्या, “७५ वर्षांचा प्रवास खाचखळग्यांचा आणि आनंदाचा होता. या प्रवासात माझे विश्व कथकने व्यापून टाकले. या प्रवासातले खड्डे, वेदना, दुःख, अडचणी हे सारे सरून आता निखळ आनंद उरला आहे. नृत्याने मला ओळख, बळ, प्रयोजन दिले. न संपणारी ऊर्जा दिली आणि प्रवाही राहण्याचे सामर्थ्य दिले. त्यामुळे मला निरंतर नृत्याची कास धरता आली. पुण्याने माझे कौतुक केले. मनात आज सकारात्मकता, समाधान आणि कृतज्ञतेची भावना आहे. आयुष्य कसे जगायचे, हेही नृत्यासह ते गुरु रोहिणीताईंनी शिकवले. संगीताची मूल्ये, निकष गुरु सुरेश तळवलकर यांनी शिकवले. परिश्रमांची तयारी असेल तर कलेची श्रीमंती ईश्वर पदरात देतोच, हे मी अनुभवले. माझ्या अनेक अप्रत्यक्ष गुरुंनी मला कला सर्वांपेक्षा मोठी, श्रेष्ठ आणि उंच असते, हे सांगितले. कुटुंबियांनी सदैव आधार, पाठिंबा दिला. माझ्या मुलींनी माझे विचार, रचना रंगमंचावर अधिष्ठित केल्या. माझा नृत्यवसा आणि व्रत त्यांच्यामुळे सार्थ ठरले.” पुण्याचे नृत्य जागतिक व्यासपीठांवर घेऊन जाण्याचे अभिवचन देऊन, त्यांनी विराम घेतला.
मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात विदुषी शमाताईंच्या शिष्यांनी त्यांच्या संरचनांचे सा
दरीकरण केले.