पिंपरी, ७ ऑक्टोबर २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहात महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खास बालनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात विश्वविक्रमी नाटक ‘अलबत्या गलबत्या’, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘राजा सिंह’ आणि आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘आज्जीबाई जोरात’ ही बालनाट्ये सादर करण्यात आली. शाळकरी विद्यार्थ्यांनीदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत बालनाट्यांचा आनंद लुटला.
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने, तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे’ आयोजन ३ ते ९ ऑक्टोबर या दरम्यान करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली आयोजित या महोत्सवात शाळकरी विद्यार्थ्यांसाठी खास बालनाट्यांचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ हे विश्वविक्रमी लोकप्रिय मराठी बालनाट्य प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सादर करण्यात आले. या नाट्यातील चेटकीण, अलबत्या, राजा, सेनापती, प्रधानजी, राजकन्या, बोकोबा आणि भाटीबाई अशा विविध पात्रांनी आपल्या अभिनय कौशल्याने मुलांना मंत्रमुग्ध केले. रंगमंचावर चेटकीण आणि अलबत्या अवतरताच प्रेक्षागृह जल्लोषाने दणाणून गेले. हास्यविनोद, रंगतदार संवाद आणि थरारक प्रसंगांनी सजलेला हा प्रयोग लहानग्यांसाठी अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांनी खळखळून हसत नाटकाचा आस्वाद घेतला आणि अभिजात मराठी भाषेच्या मनोरंजक अभिव्यक्तीची ओळख करून घेतली. या प्रयोगासाठी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने प्रेक्षागृह पूर्ण क्षमतेने भरून गेले होते.
आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात ‘आज्जीबाई जोरात’ हे मनोरंजक बालनाटक सादर करण्यात आले. या नाट्यप्रयोगात निर्मिती सावंत, जयंत वाडकर, अभिनय बेर्डे यांच्यासह इतर कलाकारांनी भूमिका साकारत बालप्रेक्षकांना हसविण्यासोबतच विचार करायला लावणारा संदेश दिला. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाटकातील विनोदी प्रसंग, आज्जीबाईंचे गंमतीशीर संवाद तसेच कौटुंबिक नात्यांवर आधारित भावनिक कथानकाने यावेळी विद्यार्थ्यांची मने जिंकली. प्रयोगानंतर प्रेक्षकांनी कलाकारांना उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘राजा सिंह’ हे बालनाट्य सादर करण्यात आले. या नाट्यप्रयोगासाठी पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले आवडते बालनाट्य पाहण्याचा आनंद लुटला. नाटकातील आकर्षक कथानक, रंगतदार संवाद आणि विनोदी प्रसंगांनी बालप्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ‘राजा सिंह’ या नाट्यप्रयोगाने विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेप्रती प्रेम, अभिमान आणि आदराची भावना निर्माण केली. तसेच मराठी लोकनाट्याची जिवंत प्रचिती देत या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीवेची बीजे रोवली.
बालनाट्य सादर करणाऱ्या कलाकारांचा महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बालनाट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान, जिव्हाळा आणि संस्कारांची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोज
न करण्यात आले होते.