पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित साहित्य चर्चेत ‘मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रवास’ या विषयावर झाले सखोल विचारमंथन
पिंपरी, ७ ऑक्टोबर २०२५ : भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून, संस्कृतीची वाहक असते. मराठी भाषेचा गोडवा, तिचा साहित्यिक वारसा आणि सामाजिक संस्कार या तिन्हींच्या माध्यमातून मराठीचा प्रवास तेजस्वी राहिला आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी आणि नव्या पिढीपर्यंत तिचा गोडवा पोहोचवण्यासाठी ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ सारखे उपक्रम उपयुक्त ठरतात, असा सूर ‘मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा प्रवास’ या विषयावर झालेल्या साहित्य चर्चेत तज्ज्ञांचा उमटला.
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या या महोत्सवात आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर छोटे सभागृह येथे साहित्यिक चर्चा पार पडली. या चर्चेत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा साहित्यिक डॉ. न. म. जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महापालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच साहित्यिक, कवी आणि साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.
या चर्चेमध्ये डॉ. जोशी यांनी मराठी साहित्य आणि शिक्षणाच्या अंगाने सविस्तर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘आज महाराष्ट्रात अनेक विद्यापीठांमध्ये मराठी हा स्वतंत्र विभाग आहे. शाळा, महाविद्यालये आणि संस्था मराठी माध्यमातून शिक्षण देतात. मराठीचे दृढीकरण, सुलभीकरण आणि उदातीकरण होणे अत्यावश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मराठी साहित्याच्या विविध टप्प्यांचा आढावा घेत पु. ल. देशपांडे यांच्या काळातील मराठीच्या सुवर्णयुगाच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.
भाषेच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी बोलताना डॉ. जोशी म्हणाले, ‘भाषा ही परिवर्तनशील आणि प्रभावी असते. उद्याच्या पिढीला मराठीचा गोडवा आणि अभिमान जाणवला पाहिजे. त्यामुळे ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ सारखे नवनवीन उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे,’ असे सांगतानाच कुसुमाग्रजांची कविता सादर करून त्यांनी मराठी भाषेचा गुणगौरव केला.
ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी म्हणाले की, ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’सारख्या उपक्रमांमुळे आपली मराठी भाषा अधिक समृद्ध होईल, अशी खात्री वाटते. तसेच वृत्तपत्रीय मराठीविषयी बोलताना त्यांनी पत्रकारितेतील भाषाशैली, बोलीभाषेचा वापर, शुद्धलेखन आणि संस्कार यांवर सविस्तर विवेचन केले. भाषेचा साधेपणा टिकवून ठेवणे गरजेचे आहे, पण त्याचबरोबर नवीन शब्द आणि प्रयोग स्वीकारले गेले पाहिजेत. मराठी ही जगातील सर्वाधिक बोलली जाणारी पंधरावी, तर भारतातील तिसरी भाषा आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
या साहित्य चर्चेमधून मराठी भाषेच्या वर्तमान स्थितीचा, साहित्यिक प्रवासाचा आणि सांस्कृतिक विस्ताराचा सखोल आढावा घेण्यात आला. मान्यवरांच्या विचारांनी उपस्थित श्रोत्यांना मराठी भाषेच्या जतन, प्रसार आणि नवकल्पनांच्या दिशेने प्रेरणा दिली. भाऊसाहेब भोईर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राजन लाखे यांनी केले, सूत्रसंचालन श्रीकांत चौगुले यांनी केले. तर आभार किरण
गायकवाड यांनी मानले.