पुणे, दि. ८ : प्रसिद्ध लेखिका आणि चित्रकार असणाऱ्या विदिशा गोएंका बजोरिया यांच्या ‘अनवोव्हन स्ट्रिंग्ज ऑफ लाईफ’ या पुस्तकाचे तसेच त्यांनी काढलेल्या ‘स्ट्रींग्ज ऑफ लाईफ’ या चित्र प्रदर्शनाचे उदघाटन राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीमध्ये संपन्न झाले. या प्रसंगी जलरंगातून चित्र काढणारे प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक, ब्रह्मकुमारी केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी नलिनी, केंद्राच्या ज्येष्ठ सदस्या श्रद्धा, ज्येष्ठ पत्रकार व संपादक विनिता देशमूख, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वन्य जीवनावरील चित्रकार सुषमा जैन हे मान्यवर उपस्थित होते.
विदिशा यांच्या ‘स्ट्रींग्ज ऑफ लाईफ’ या प्रदर्शनात एकंदर ७० पेंटिंग असून त्यातून निसर्ग, वन्यजीवन, आकाशातील विविध छटा, उत्सवीपणा, समर्पण, गूढता आणि मानवी भाव-भावनांतील सौंदर्य प्रतिबिंबीत करण्यात आले आहे. त्यांच्या कलेच्या दर्पणातून त्यांच्यातील सखोल आध्यात्मिक दृष्टिकोनाचा एक व्यापक पट उलगडत गेला असून त्यातून अंतरंग व बहिरंग जगाचे दर्शन घडवताना ते पाहणाऱ्या रसिकांशी थेट जोडताना त्याच्या अस्तित्त्वाचे सौंदर्यच द्विगुणीत करतात.
यातून त्या चित्रांच्या माध्यमातून सखोल संवाद व शांततेच्या प्रार्थनेचा अनोखा क्षण साधत इतरांना त्याच्याशी जोडून घेत जीवनाचा नितांत सुंदर अनुभव देतात. हे प्रदर्शन राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीमध्ये १२ ऑक्टोबर पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ दरम्यान रसिकांसाठी उपलब्ध आहे.
एक पेंटर आणि कथाकार असणाऱ्या विदिशा यांचे एकमेव ध्येय म्हणजे जिथे वेदना आहे तिथे प्रकाश, जिथे निराशा आहे तिथे आशा आणि शांततेला सखोल अर्थ देण्याची क्षमता हे आहे.
आपल्या पुस्तकाबद्दल त्या म्हणाल्या की, ‘स्ट्रींग्ज ऑफ लाईफ’ म्हणजे अर्थपूर्ण आयुष्यासाठी केलेला पाठपुरावा करताना सापडलेले दोन साधे वाटणारे पण गहन अर्थ असणारे मंत्र माझ्या अंतरंगात आजवर उमटत गेले आहेत. त्यातला एक म्हणजे ‘जे कराल ते उत्तम करा.आणि दुसरे म्हणजे आजचा क्षण आपला आहे, तर उद्याचे जगणे हे केवळ स्वप्न आहे.’ हे पुस्तक ही दोन शाश्वत तत्त्वेच माझ्या शब्दांच्या कथनातून मांडताना एक एक वैश्विक सत्य सांगत वाचकाला जगण्यातील अनिश्चिततेतून आनंद आणि लवचिकता शिकवण्याचे मार्गदशन करतील.
यातील प्रत्येक प्रकरण हे जगण्यातील आव्हाने, विजय आणि साध्या सुध्या घटनांमधून घडत जाणाऱ्या प्रत्येक दिवशी करताना जे कराल ते उत्तमच कराल हाच धडा शिकवतो. त्याच बरोबर उद्याच्या अनिश्चित वाटू शकणाऱ्या स्वप्नांकडे पाहताना केलेल्या सर्वोत्तम प्रयत्नांमध्ये आजच्या क्षणाचा प्रतिध्वनी वाचकाला त्यातील प्रिय वाटणारा प्रत्येक क्षणात उमटून तो प्रेरणादायी ठरेल.
आध्यात्मिक परंपरा व सेवा यांचे जतन करणाऱ्या विदिशा गोएंका बजोरिया या प्रसिद्ध आध्यात्मिक संत आणि गोरखपूरच्या गीता प्रेसचे संस्थापक जयदयाळजी गोएंका यांच्या पणती तसेच ज्येष्ठ कवी, विद्वान व तत्त्ववेत्ते माधव प्रसादजी गोएंका यांच्या कन्या आहेत. आपल्या लेखनातून आणि कलेतून त्यांनी भक्तीरस आणि सर्जनशीलतेचा वारसा व कार्य जप
ले आहे.