सोलापूर आणि मराठवाडा परिसरातील पूरग्रस्तांसाठी जनसेवा सहकारी बँकेच्या वतीने ११,२५,०००/- (रुपये अकरा लाख पंचवीस हजार फक्त) रुपयांचा मदतनिधी बुधवारी (ता. १ ऑक्टोबर) सेवा भारती, पश्चिम महाराष्ट्र या संस्थेकडे सुपुर्द करण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ आणि उपाध्यक्ष रवि तुपे यांच्या हस्ते निधीचा धनादेश सेवा भारतीचे पदाधिकारी प्रदीप सबनीस, सुधीर जवळेकर, अड. महेंद्र तुपे, श्रीकांत म्हेत्रे, डॉ. अर्चनाताई चव्हाण आणि संतोष काळे यांनी हा धनादेश स्वीकारला. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष पोळेकर, संचालक राजेंद्र वालेकर, संचालिका सौ. आशाताई बहिरट, सेवक संचालक जितेंद्र दाभाडे, ज्योतिबा कांबळे, जनसेवा बँक हडपसर कर्मचारी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मनोहर देशमुख, पदाधिकारी श्रीनिवास खळदकर आणि सेवा भारतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वांना धान्य पुरवठा करणाऱ्या पोशिंद्या शेतकरी कुटुंबियांची दिवाळी आनंदाची व्हावी व त्यांच्या घरामध्ये समृध्दीचा दीप उजळविण्याच्या उद्देशाने जनसेवा सहकारी बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकीच्या नात्याने केवळ एका दिवसात हा निधी जमवून सेवा भारतीकडे दिला आहे. यावर्षी देशभरात सरासरीपेक्षा खूपच जास्त पाऊस पडलेला आहे. यामध्ये नागरिकांचे व प्रामुख्याने शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातसुध्दा शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून विशेषतः सोलापूर, मराठवाडा या भागामधील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झालेले आहे. त्यांच्यावरील या संकटाची दखल घेत जनसेवा बँकेने तातडीने हा मदत निधी उभारला.
देशात कोठेही एखादी नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा जनसेवा बँक नेहमीच भरीव मदत करीत असते. यापूर्वी सुध्दा चक्रीवादळ, भूकंप, दुष्काळी परिस्थितीमध्ये बँकेचे संचालक व सेवकांनी आर्थिक साहाय्याबरोबरच प्रत्यक्ष मदतीत सक्रीय सहभाग दिलेला आहे. सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यात जनसेवा बँक कायमच अग्रेसर राहिली
आहे.