पुणे : आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये गुरुचे उच्च स्थान आहे. आपली गुरुकुल परंपरा खंडित झाल्याने आपण हजारो वर्ष गुलामगिरीत गेलो. शिक्षण हा मोठा संस्कार असून शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता इतिहास व संस्कृतीचा अभ्यास व्हायला हवा, असे मत रा.स्व.संघ कसबा नगर संघचालक डॉ. दीपक रोकडे यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या माध्यमातून प्रतिवर्षी इयत्ता १०वीत शिकणाऱ्या होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाचे परीक्षा शुल्क कै. संत शिवगंगादेवी बार्शीकर यांचे स्मरणार्थ ‘श्री संत माई विद्यावृत्ती’ या नावाने दिले जाते. श्री नामदेव शिंपी कार्यालय कसबा पेठ शिंपी आळी येथे आयोजित कार्यक्रमात विद्यावृत्ती प्रदान करण्यात आली. यावर्षी उपक्रमात शताब्दी वर्ष साजरे करणारे श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान कसबा पेठ पुणे व श्रेयस को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि, नवी सांगवी पुणे या दोन संस्थांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. भूषण पाटील, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठान उत्सव प्रमुख सचिन पाठक, श्रेयस को ऑप क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रबोधिनी कार्याध्यक्ष व उपक्रम प्रमुख प्रा.संगीता मावळे आदी उपस्थित होते.
डॉ. भूषण पाटील म्हणाले, अभ्यास आणि कष्ट याला पर्याय नाही. त्यामुळे यातूनच आपण यश खेचून आणले पाहिजे. गुण मिळविणे गरजेचे असले, तरी देखील त्यासोबत स्वतः चे ध्येय शोधणे गरजेचे आहे. कला आणि क्रीडा या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आजच्या युगात संगणक ज्ञान गरजेचे आहेच, मात्र भाषेवरील प्रभुत्व असायला हवे.
आचार्य शाहीर हेमंत मावळे म्हणाले, समाजासाठी काहीतरी करायचे आहे, ही भावना ठेवून काम करावे, हा अशा उपक्रमांमधील उद्देश आहे. समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य म्हणून विद्यावृत्ती सारखा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यामध्ये स्वरूपवर्धिनी, शेठ हिरालाल सराफ प्रशाला, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, आपलं घर अशा विविध संस्था व शाळांतील तब्बल ५० हून अधिक विद्यार्थ्यांना विद्यावृत्ती देण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. प्रा. संगीता मावळे यांनी प्रास्ताविक केले. अक्षदा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले व नंदिनी देवकर यांनी आभार मानले.