आयुष्यात सत्यासाठी लढणे महत्वाचे _ माजी खासदार इम्तियाज जलील

तारां कित Avatar

 

पुणे, प्रतिनिधी _

धर्म हा धंदा सध्या जोरात सुरू आहे. सुशिक्षित लोकांच्या सोशल मीडियावर पोस्ट वाचून ते कसे शिकार होतात हे पाहणे दुःखदायक आहे. त्यांनी पुढाकार घेऊन धर्म आणि जाती मधील वाद मिटविला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर येथील रामनवमी पूर्वीची दंगल ही राज्य पुरस्कृत होती आणि पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलीस घटनास्थळी उपस्थित नव्हते. निवडणूक जिंकण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम दंगल करून भयाचे वातावरण निर्माण केले जाते. पैसे खर्च न करता दबाव निर्माण केला जाऊन वातावरण अशांत केले जात आहे. आयुष्यात सत्यासाठी लढणे महत्वाचे असल्याचे मत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

 

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल

यांच्या वतीने गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा गांधी आणि राष्ट्रीय एकात्मता विषयावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ.शिवाजी कदम, सचिव अन्वर राजन , डॉ.एम एस जाधव, स्वप्नील तोंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला संविधान उद्देशिका वाचन करण्यात आले.

 

इम्तियाज जलील म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दोन उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती संभाजीनगर ते पुणे प्रवास एकदा करून दाखवावा त्यांना मी २० हजार रुपये बक्षीस देतो. मला या रस्त्यावरून येण्यास आज आठ तास वेळ लागला. विकासाच्या नावावर गप्पा मारणारे साधा रस्ता देखील विकसित करू शकत नाही हे दिसून येते. माझ्यावर अनेक केसेस दाखल करण्यात आला असून हर्सूल कारागृहात पाठविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. २४ वर्षाचा पत्रकारिता अनुभव मला आहे. महात्मा गांधी यांनी जी शिकवण दिली त्यानुसार आपण वाटचाल करतो आहे का हे तपासून पाहणे गरजेचे आहे. देशात राजकारण स्तर ज्याप्रकारे घसरत आहे त्याने परिस्थिती चिंताजनक होत असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी यांच्याकडून खुर्ची टिकवण्यासाठी जाती धर्मात भांडणे लावली जात आहे. देशात काही लोक चांगले आहे म्हणून देश चालला आहे. देशातील चांगल्या लोकांनी गप्प न बसता आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे. हाताला काम मागितले तर दगड देण्यात येतो, एकता मागितले तर जातीधर्मात तेढ निर्माण केला जात आहे आणि शांतता हवी तर दंगल दिली जात आहे. शहरातील जातीचे विष आज ग्रामीण भागात पोहचले आहे. एकत्र राहणारे लोक आज विभक्त झाले आहे. आपल्या देशात आणि राज्यात जातीय तेढ नेमके कोण निर्माण करते तपासून पहिले पाहिजे.

लोकांच्या विश्वासावर मी २८ दिवसात आमदार आणि २२ दिवसात खासदार झालो होतो. त्यानंतर

संसदेत मी प्रथम गेलो तेव्हा मला मोठ्या लोकांसोबत काम करता येईल असे वाटले. पण ज्या लोकप्रतिनिधी यांना आपण निवडून देतो ते शिक्षित हवे तरच ते संसदेत मुद्दा नीट मांडू शकतात. ८५ टक्के लोक संसदेत मुद्दा नीट मांडण्यात कमी पडतात. मुस्लिम खासदार यांना वेगळ्या प्रकारचे वाईट अनुभव संसद परिसरात येतात. विरोधी पक्ष यांच्यावर टाकला जाणारा दबाव, अस्वस्थ नागरिक, पत्रकारांवर दडपण हे भयाण चित्र आहे. “आय लव्ह मोहम्मद” काही जण म्हणत आहे त्यावर मोठा गोंधळ सध्या सुरू आहे. मुस्लिम तरुणांनी जो आपल्याला सदमार्ग सांगितला त्या रस्त्याने चालणे आवश्यक आहे. केवळ पोस्टर हातात धरून आपण काही करू शकतो हे वागणे चुकीचे आहे.निवडणूक येतील आणि जातील देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी एकात्मता भावना हवी आहे. सर्व लोक विकास करतील तरच देश पुढे जाऊ शकेल. देश आपल्या सर्वांचा आहे, कोणा एकाचा नाही. देशाला स्वातंत्र्य देताना कोणी जातीधर्म विचार केला नाही सर्वजण एकत्रित लढले. सातत्याने देशभक्ती प्रमाणपत्र एका धर्माच्या लोकांना मागितले जाते. मी एक कट्टर भारतीय असून त्याचा मला अभिमान आहे. देशात कुठे औरंगजेब जन्मदिवस साजरा केला जात नाही. त्याच्याशी कोणाला काही घेणे देणे नाही. पण सतत आम्हाला त्याबाबत प्रश्न विचाराने खेदजनक आहे. जाती धर्म मधील भिंती तोडल्या गेल्या नाही तर त्या विनाशाचा

सर्वांनाच त्रास होईल.

यानंतर कुमार सप्तर्षी यांनी महात्मा गांधी सप्ताह मोठ्या प्रमाणात सर्वांनी प्रतिसाद दिला याबद्दल आभार मानले तसेच गांधी सप्ताह उत्साह त पार पडल्याची भावना यावेळी व्यक्त केली.

Tagged in :

तारां कित Avatar