राज्यात सक्षम वैद्यकीय यंत्रणा उभारण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार
· एमईएमएस १०८ या प्रकल्पांतर्गत राज्यातील विविध भागांत सुमीत एसएसजीकडून हजारांहून अधिक रुग्णवाहिकांची सोय केली जाणार.
· अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप कंपनीकडून २ हजार ३०० हून अधिक डॉक्टरांची नेमणूक होईल. वैद्यकीय आपत्कालीन प्रतिसाद प्रोटोकॉलअंतर्गत अपोलो मेडिस्कील्स ४ हजार ५०० हून अधिक वैद्यकीय कर्मचा-यांना आवश्यक प्रशिक्षणाचे धडे देईल.
· एमईएमएस१०८ हा जागतिक पातळीवरील आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा उभारण्यासाठी आखलेला सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळखला जातो.
पुणे, १० ऑक्टोबर २०२५: राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे बळकटीकरण व्हावे तसेच पायाभूत वैद्यकीय सुविधांचे जाळे वाढवण्यासाठी सुमीत एसएसजीने अपोलो हॉस्पिटल्स समूह कंपनीच्या युअरलाइफ आणि अपोलो मेडिस्किल्ससोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (एमईएमएस१०८) या प्रकल्पांतर्गत ही भागीदारी जाहीर करण्यात आली आहे. या भागीदारीमुळे राज्यभरातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांची क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत वैद्यकीय कर्मचा-यांची योग्य प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारणे, यंत्रणेत गतीमानता यावी, कार्यक्षमता निर्माण व्हावी याकरिता तजवीज करणे हे या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट आहे. राज्यातील प्रत्येक शहरी तसेच ग्रामीण भागात राहणा-या रुग्णाला विनामूल्य वैद्यकीय सेवा मिळावी, वैद्यकीय सेवा पुरवण्यात कोणतीही कमतरता राहू नये याकरिता या भागीदारीतून विविध उपक्रम राबवले जातील.
सुमीत एसएसजी राज्यभरातील विविध ठिकाणी हजारांहून जास्त रुग्णवाहिकांची उपलब्धता करुन देईल. या रुग्णवाहिकांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, चालक यांचा समावेश असेल. आपत्कालीन परिस्थितीत जलद आणि प्रभावी उपचार देण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. शहरी तसेच ग्रामीण भागांतील आरोग्य सेवांमधील कमतरता दूर सारण्यासाठी मोठ्या संख्येने रुग्णवाहिकांचे नियोजन केले जात आहे. राज्यातील दुर्गम भागांतही रुग्णवाहिका नियुक्त केल्या जातील. रुग्णवाहिकांच्या उपलब्धतेमुळे गरजू रुग्णाला तातडीने योग्य प्रकारे सक्षम प्राथमिक पातळीवरील वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, असा या उपक्रमामागील मानस आहे.
अपोलो इकोसिस्टीमही सक्षम वैद्यकीय यंत्रणा उभारण्यासाठी विस्तृत पातळीवर योजना राबवणार आहे. अपोलो इकोसिस्टीम युअरलाईच्यावतीने तब्बल २ हजार ३००हून अधित पात्र डॉक्टरांची नियुक्ती करेल. अपोलो मेडिस्कीलच्यावतीने सुमीतएसएसजीच्या ४ हजार ५०० हून अधिक कर्मचा-यांना विशेष प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. हे सर्व कर्मचारी एमईएमएस १०८ प्रकल्पांतर्गत आपत्कालीन वैद्यकीय कर्मचा-यांच्या तातडीच्या नेमणुकीसाठी सज्ज असतील.
या सर्व प्रक्रियेत अपोलो मेडिस्कील्सची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरेल. अपोलो मेडिस्कील्स आपत्कालीन सेवा देणा-या कर्मचा-यांना रुग्णकेंद्रित उपचार, अत्याधुनिक अपघात व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थितीत सर्वोत्तम उपाययोजना राबवण्यात प्रशिक्षण देईल. हा वैद्यकीय आपत्कालीन प्रतिसाद प्रोटोकॉल हा राष्ट्रीय आरोग्य अभियान, एनएबीएच, एनएमसी, एआयआयएमएस आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रुग्ण सुरक्षा मानांकनांशी सुसंगत प्रोटोकॉल आहे. कर्मचा-यांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचे ज्ञान, प्रतिसाद व्यवस्थापन सक्रियता, मुलभूत आणि अत्याधुनिक जीवनसुरक्षा प्रणाली, आपत्कालीन परिस्थितीतून रुग्ण वाचल्यानंतर पुढील प्रक्रियेतील रुग्णसेवा आदींचे प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाईल. या प्रशिक्षण काळात कर्मचा-यांना लेखापरिक्षण, चर्चा तसेच संवाद कौशल्यही शिकवण्यावरही अपोलो मेडिस्कील्सचे अधिकारी सहभागी होतील.
हा कार्यक्रम अपोलोची वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्ता, करुणा तसेच रुग्ण सुरक्षिततेचा मापदंड कायम राखण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामुळे प्रत्येक प्रतिसादकर्त्याला गंभीर तसेच संवेदनशील परिस्थितीतही अचूकतेने आणि सहानुभूतीने उत्तम दर्ज्याची रुग्णसेवा देण्याचे कौशल्य निर्माण होईल. कर्मचा-यांच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणामुळे वैद्यकीय सेवेचे जाळे राज्यभरात सर्वदूर पोहोचेल.
तिन्ही संस्थाची भागीदारी राज्यात सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. सुमीत यांचा भारतातील कार्यान्वयन कौशल्य, एसएसजी स्पेनचे युरोपातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्राचे ज्ञान आणि कौशल्य तसेच अपोलोची वैज्ञानिक उत्कृष्टता, जागतिक स्तरावरील वैद्यकीय पद्धतीचा अवलंब यां सर्व घटकांचा सुरेख मिलाफ उदयास येईल. राज्यातील आरोग्यसेवा यंत्रणेची रुपरेषा बदलण्यासाठी ही भागीदारी महत्त्वपूर्ण योगदान देईल. या एकत्रित प्रयत्नांमुळे राज्यातील आपत्कालीन प्रतिसादाच्या मानांकनांमध्ये नवा आदर्श निर्माण होईल, असा विश्वास भागदारकांनी व्यक्त केला. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुलभ, विश्वसनीय आणि गुणवत्तापूर्वक आरोग्यसेवा देण्याच्या सामायिक ध्येयापोटी ही भागीदारी करण्यात आली आहे. या सहकार्यातून आरोग्यसेवेचा वेळोपरत्वे बळकटीकरण होत जाईल, असेही भागदारकांडून सांगण्यात आले.
‘‘सुमीत एसएसजीच्या कार्यक्षमतेमुळे आणि अपोलोच्या विश्वसनीय आरोग्यसेवा प्रणालीमुळे राज्यात आता आपत्कालीन सेवेचे नवे मापदंड निर्माण होईल. राज्यातील नवी आरोग्यसेवा यंत्रणा देशभरातील आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी नवा आदर्श ठरेल. या आरोग्य यंत्रणेचे इतर राज्यांमध्येही अनुकरण केले जाईल.’’, असा विश्वास सुमीत एसएसजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधांशु करंदीकर यांनी व्यक्त केला.