पिंपरी, १० ऑक्टोबर २०२५ : शब्दांनी भारलेले वातावरण आणि रसिकांच्या टाळ्यांचा लयबद्ध गजर… अशी मराठी भाषेच्या अभिजात सौंदर्याची अनुभूती देणारा ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चा समारोप महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या कविसंमेलनाने झाला. भावनांच्या धाग्यांनी विणलेली, समाजमनाच्या वास्तवाशी संवाद साधणारी आणि मराठी भाषेच्या माधुर्याने नटलेली ही काव्यमैफल ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’चा सुवर्ण समारोप ठरली. या कविसंमेलनात कवितेच्या प्रत्येक ओळीतून समाज, संस्कार, प्रेम, वेदना, संघर्ष आणि संवेदनशीलता या सर्वच भावविश्वांचा सुरेल मेळ उलगडला.
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने, तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान साजरा करण्यात आलेल्या या भाषा सप्ताहाचा शेवट हा खऱ्या अर्थाने कवितेच्या उत्सवाने झाला.
पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहआयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सहायक आयुक्त अतुल पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन शिरूर येथील कवी भरत दौंडकर यांनी केले. त्यांनी ‘माझ्या कवितेला नाव नाही’ ही कविता सादर करून शब्दांच्या ओवाळ्यातून माणुसकीचा सुगंध दरवळवला. काव्यसंमेलनाची सुरुवात अकोल्याचे कवी विठ्ठल वाघ यांच्या ‘काळया मातीत मातीत..तिफन चालते’ या सामाजिक भान जागवणाऱ्या कवितेने झाली. मातीतून उगवलेल्या कष्टाळू माणसाच्या आयुष्याचा गंध त्यांच्या ओळींमधून दरवळला.
कर्नाटक मधल्या बेळगांवहून आलेले कवी आबा पाटील यांनी त्यांच्या ‘मोनालीसा’ कवितेतून वास्तव आणि कल्पनारंजन यांची सुंदर सांगड घातली. ‘माझा भाकरीचा शोध संपेपर्यंत अशीच हसत रहा मोनालीसा…’ असे म्हणत त्यांनी जीवनातील ताण-तणाव आणि गरिबीतील संघर्षातील करूण वास्तव मांडले. त्यांच्या ‘अनुभव’ या कवितेनेही जीवनाच्या खोल गाठींना स्पर्श केला. नांदेडचे कवी नारायण पुरी यांच्या ‘काटा’ आणि ‘जांगड गुत्ता’ या कवितांना रसिकांनी दाद दिली. सांगली जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील कवयित्री नीलम माणगावे यांनी ‘किंमत चुकवावी लागते’ या कवितेत लेखनाच्या जबाबदारीचा आणि समाजप्रबोधनाचा सखोल अर्थ उलगडला. ‘लेखणीला शब्दाची धार पाहिजे, आणि किंमत चुकवण्याची तयारी पाहिजे…’ या त्यांच्या ओळींनी रसिकांची वाहवा मिळवली. कल्याणचे कवी प्रशांत मोरे यांनी ‘बाई दुःखाच्या कष्टाने लिपाव्या भेगा’ आणि ‘बाई फुफाटा फुफाटा बाई गं…’ या कवितांमधून स्त्रीजीवनातील ताण, वेदना आणि लढ्याची जिवंत चित्रे उभी केली. नाशिकचे कवी प्रशांत केंदळे यांनी ‘बाप लेकीची कहाणी’ या कवितेतून बाप-लेक संबंधांची भावस्पर्शी मांडणी केली. ‘लेक सोडताना घर त्याचे फुटते अंबर…’ या ओळींना रसिकांनी उभे राहून दाद दिली. पिंपरी चिंचवड येथील कवी अनिल दीक्षित यांनी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या ‘पत्रठेव’ या कवितेवर आधारित सादरीकरण केले. ज्येष्ठ कवी आबा पाटील यांच्या ‘तोतान’ या कवितेने कविसंमेलनाचा समारोप झाला
.