पुणे:
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (शासकीय) पुणे च्यावतीने जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवारी जंगली महाराज रोड येथे मानवी साखळी तसेच पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे हा होता.
या उपक्रमात संस्थेचे अधिकारी, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे उडान फाउंडेशन आणि सूर्यदत्ता कॉलेज, बावधन यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. पथनाट्याद्वारे मानसिक आजारांविषयी असलेली भीती, गैरसमज आणि सामाजिक कलंक दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे संचालक प्राध्यापक डॉ. अजय चंदनवाले हे उपस्थित होते. त्यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देत समाजातील प्रत्येक घटकाने या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहण्याचे आवाहन केले.
याशिवाय, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेत मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासाठी मानसिक आरोग्य विषयक जनजागृती व त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यात प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांद्वारे मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याबरोबरच सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचा संदेश देण्यात आला.
—————————-