प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांचेकडून दिवाळी सणनिमित्त आकर्षक क्रमांक आरक्षण व लिलाव प्रक्रिया जाहीर

तारां कित Avatar

पुणे, दि. 13 ऑक्टोबर (जिमाका, वृत्तसेवा): दिवाळी सणानिमित्त वाहनखरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांना त्यांच्या वाहनांची नोंदणी वेळेत होऊन, सणासुदीच्या सुट्यांमध्येही क्रमांक मिळावा याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे.

 

खाजगी चारचाकी वाहनांसाठी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्काच्या (तीनपट शुल्क) भरपाईवर इच्छुकांनी दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज सादर करावेत. अर्जासोबत डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. लिलाव प्रक्रियेसाठीचे डीडी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील, तसेच लिलाव त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता सभागृहात पार पडेल.

 

दुचाकी वाहनांसाठीचे अर्ज १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० दरम्यान सादर करावेत, त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२५ रोजी लिलाव दुपारी ४.०० वाजता सहकार सभागृहात आयोजित केला जाईल.

 

डीडी “RTO, Pune” यांच्या नावाने नॅशनलाइज्ड/शेड्युल्ड बँकेचा पुणे येथील असावा व दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. प्रत्येक क्रमांकासाठी केवळ एकच सीलबंद पाकीट ग्राह्य धरले जाईल. एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त पाकीटे आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. लिलावात समान रकमेचे डीडी प्राप्त झाल्यास क्रमांक लॉटरी पद्धतीने (चिठ्ठ्या टाकून) निश्चित केला जाईल. लिलाव प्रक्रियेत अर्जदार उपस्थित असो वा नसो, प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

 

पसंती क्रमांक राखून ठेवण्याची वैधता १८० दिवस असून, आता NIC पोर्टलवर वैधता संपलेले क्रमांकही पुन्हा उपलब्ध होतात. फक्त पुणे RTO कार्यक्षेत्रातील पत्ता असलेल्या वाहनधारकांचेच अर्ज ग्राह्य धरले जातील. चुकीच्या रकमेचा डीडी, कार्यक्षेत्राबाहेरील पत्ता किंवा मोबाईल क्रमांक नोंद नसलेले अर्ज बाद करण्यात येतील.

 

लिलावानंतर उर्वरित पसंती क्रमांक ऑनलाईन पद्धतीने वितरित केले जातील. नागरिकांनी https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर नाव व आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक वापरून नोंदणी करून अर्ज व शुल्क भरून पसंती क्रमांक आरक्षित करता येईल. याकरिता कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

0000

Tagged in :

तारां कित Avatar