संशोधक व अभियंत्यांचे कार्य देशासमोर आले पाहिजे* *निवृत्त एअर मार्शल प्रदीप बापट यांचे मत : स्नेह सेवा, मैत्रेय चॅरिटेबल सोसायटीतर्फे सीमावर्ती सैनिकांसाठी दिवाळी फराळ*  

तारां कित Avatar

 

 

पुणे : भारत आज खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होत आहे. सैन्यामध्ये देखील अनेक गोष्टी पूर्वी बाहेरून मागवाव्या लागत असत, त्या आता आपण स्वतः बनवत आहोत आणि अद्ययावतही होत आहोत. नेहमी आम्ही सैनिक अधिकारी पुढे दिसतो, परंतु हे ज्यांच्यामुळे होत आहे ते संशोधक आणि अभियांता देशासमोर आले पाहिजेत. त्यातूनच नव्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि नव्या संशोधनाची दिशा निर्माण होईल, असे मत निवृत्त एअर मार्शल प्रदीप बापट यांनी व्यक्त केले

 

स्नेह सेवा आणि मैत्रेय चॅरिटेबल सोसायटी तर्फे ‘सैनिक-स्नेह’ या उपक्रमांतर्गत दिवाळीनिमित्त सीमावर्ती भागांतील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जम्मू, लेह, लडाख, सियाचीन तसेच पूर्वोत्तर सीमांवरील दिब्रूगड आणि तवांग येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पहारा देणाऱ्या सैनिकांना दिवाळी फराळ पाठविण्यात आला.

 

नवी पेठेतील निवारा सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राधा संगमनेरकर, सैनिक स्नेह सदस्य डॉ. दिनेश पांडे, सुधीर पळसुले, अविनाश जोशी, भालचंद्र अंबुलकर, नीला सरपोतदार, शेखर फुलंब्रीकर, चितळे बंधु समुहाचे श्रीकृष्ण चितळे व संजय चितळे उपस्थित होते. स्नेह-सेवा ही संस्था गेली २९ वर्षे हा उपक्रम राबवित आहे. यंदा देखील संस्थेतर्फे दिवाळी फराळाची तब्बल ७५०० पाकिटे सैनिकांसाठी पाठविण्यात आली आहेत.

 

प्रदीप बापट म्हणाले, आपण प्रगती करत असलो तरी पुढे होणारी युद्ध ही केवळ देशाच्या सीमेवर नाही तर देशांतर्गत होणार आहेत. ज्याची सुरुवात सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहेच. त्यामुळे सोशल मीडियावर देखील अलर्ट राहणे आपल्याला शिकले पाहिजे. कोणताही मेसेज पुढे पाठविताना त्याची सत्यता तपासली पाहिजे. प्रत्येक पिढीला याचे प्रशिक्षण दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

 

संजय चितळे म्हणाले, पुण्याच्या संस्कृतीत स्नेहसेवा हे अनेक वर्षे काम करीत आहे. त्यांच्या या सत्कृत्यात चितळे समूहाला देखील सैनिकांची सेवा करण्याची संधी मिळाली. अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देऊ, असेही त्यांनी सांगितले.

 

प्रत्येक सणाच्या काळात देशातील नागरिक आमची आणि आमच्या कुटुंबीयांची आठवण ठेवतात. त्या वेळी वाटते की आम्ही एकटे नाही, तर संपूर्ण देश आमच्यासोबत आहे. आमच्या कुटुंबाची काळजी घेतली जाते, तेव्हा आम्ही निर्धास्तपणे आणि अधिक जोमाने कर्तव्य पार पाडतो, अशी भावना सैनिकांनी व्यक्त केली. तब्बल ४० शाळेतील मुलांनी तयार केलेली दिवाळी भेट कार्डे ही पाठवली आहेत. सूत्रसंचालन श्याम भुर्के यांनी केले.

Tagged in :

तारां कित Avatar