पिंपरी दि. १४ ऑक्टोबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उर्दू प्राथमिक शाळा, कासारवाडी येथे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते आठवीतील एकूण ८९ विद्यार्थी सहभागी झाले, तर ३० विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला होता.
शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मानसिक आरोग्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. शाळेच्या समुपदेशक ऋतिका बेलदार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून तणावमुक्त राहण्याचे उपाय, आत्मविश्वास वाढविण्याचे मार्ग आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमानंतर “मानसिक आरोग्याचे महत्त्व” या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी रंगांच्या माध्यमातून मानसिक आरोग्याचे संदेश प्रभावीपणे व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये, कविता आणि लघुनाटिका सादर करून कार्यक्रमाला अधिक रंगत आणली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना योग व ध्यानाचा सराव, तसेच अडचणींच्या वेळी विश्वासू व्यक्तींशी संवाद साधण्याचा सल्ला देण्यात आला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरला, असे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.