पिंपरी, दि. १४ ऑक्टोबर २०२५: पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळील भंगार साहित्याच्या गोदामाला (स्क्रॅप यार्ड) आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ही आग नियंत्रणात आणली आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागातून देण्यात आली.
अग्निशमन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला भंगार साहित्याच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाल्यावर तात्काळ पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने अग्निशमन दलाच्या एकूण १० वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवत ही आग पूर्णपणे विझवली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, आपल्या परिसरातील अनावश्यक स्क्रॅप टेरेस, बाल्कनी, पार्किंग, बेसमेंट अशा ठिकाणी साठवून ठेवलेले सर्व ज्वलनशील अनावश्यक साहित्याची सुरक्षेच्या दृष्टीने योग्य विल्हेवाट लावा, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले आहे.
……
कोट
गोदामाला आग लागली असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्परतेने प्रतिसाद देत अवघ्या काही वेळात आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी अशा आगीच्या आपत्कालीन घटनांबाबत अग्निशमन विभागाशी तातडीने संपर्क साधून माहिती द्यावी. जेणेकरून मोठी दुर्घटना टाळणे शक्य होईल.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
……
कोट
नेहरूनगर येथील आगीच्या घटनेमध्ये आमच्या अग्निशामक जवानांनी अत्यंत धैर्य दाखवून आग वेळेत नियंत्रणात आणली. स्क्रॅप यार्डमध्ये आग झपाट्याने पसरत होती, परंतु आमच्या टीमच्या प्रशिक्षण आणि तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
– उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
…..
कोट
आग लागल्याची माहिती मिळताच आम्ही ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो. यार्डमध्ये लाकूड आणि प्लास्टिक असल्यामुळे आग झपाट्याने पसरत होती, परंतु सर्व अग्निशमन पथकांनी सर्व दिशांनी पाण्याचे फवारे मारून आगीचे प्रमाण सुरुवातीला नियंत्रणात आणले आणि समन्वय साधून आग विझवण्यात यश मिळवले.
– ऋषिकांत चिपाडे, उप अग्निशम
न अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका