पुणे शहरातील- मुख्य रस्त्यांसोबत गल्लीबोळांचे देखील डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी क्रिएटिव्ह फौंडेशनचे प्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदिप खर्डेकर यांनी पुण्याचे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
पुणे ग्रँड चॅलेंज टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्ते गुळगुळीत होणार असल्याचे समजले. ही निश्चितच पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे.
मात्र प्रामाणिकपणे मनपा चे सर्व कर भरणाऱ्या वर्गाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
आयुक्त साहेब दुचाकी वरून प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बंधू, विद्यार्थी येवढेच नव्हे तर सामान्य कष्टकरी, कामगार वर्ग असो वा इतर सामान्य पुणेकर. ह्या सर्वांचा प्रवास हा ज्या गल्लीबोळातून होतो त्याची झालेली चाळण बघवत नाही. शहरात खड्डेयुक्त रस्त्यांची यादीच देता येईल.
आता मॉनसून परतलाय, वातावरण रस्त्यांच्या कामासाठी पोषक आहे. तरी ह्या पत्राद्वारे आपणास आग्रही मागणी करत आहे की ” मुख्य रस्त्यांप्रमाणे गल्लीबोळांचे डांबरीकरण देखील त्वरित सुरु करावे “.
दुरावस्था झालेले आणि पुणेकरांना जडलेल्या कंबरदुखी वा मानदुखी चे मुख्य कारण हे रस्त्यांची झालेली चाळण व असमतोल रस्ते,रस्त्याच्या सम पातळीत नसलेले ड्रेनेज ची झाकणे अशी कारणे आहेत हे आपण जाणताच.
तरी त्वरित क्षेत्रीय कार्यालयांकडून खड्डयांनी भरलेल्या रस्त्यांची सूची तयार करवून घ्यावी आणि त्यांचे डांबरीकरण कधी होणार याची माहिती पुणेकरांना द्यावी अशी आग्रही मागणी करत आहे.