राष्ट्रीय युद्ध स्मारक” दिल्ली मध्ये उभारले गेले आहे पण, त्याला “राष्ट्रीय शौर्य स्मारक” म्हटले जात नाही. दुसऱ्यांना चिथावणी देणारे सनातनी लोक असून त्याचा सामना वैचारिक पातळीवर केला पाहिजे. भारतीय स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य काळातील स्मारक या इतिहासाची मोडतोड सध्या सत्ताधारी यांच्याकडून सुरू आहे. भारतीय स्वातंत्र्य लढा आणि प्रतीक हे सत्ताधारी यांनी हायजॅक केले आहे. ही बाब गांधी विचारधारानुसार लोकांना समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. टोकाच्या भूमिका घेण्यापासून आतापर्यंत सत्ताधारी यांनी वेगवेगळया समाजाला रोखले होते परंतु आता समाजात विविध जातीधर्मात टोकदार भूमिका मांडल्या जात आहे. देशातील विविधता टिकण्यासाठी संसदीय लोकशाही प्रणाली आणली गेली असून हुकूमशाही भूमिकेपासून ती टिकवली पाहिजे. उदारमतवादी मध्यममार्गी विचारधारा याचे अनुसरण आपल्याला करावे लागणार आहे असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनंत बागाईतकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह, टिळक रस्ता, पुणे याठिकाणी
‘सत्याग्रही विचारधारा’ ३४व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी अध्यक्ष व संपादक डॉ. कुमार साप्तर्षी , व्यकटेशं केसरी, विश्वस्त जेष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख,ॲड अभय छाजेड,अन्वर राजन , अंजली सोमण उपस्थित होते.
अनंत बागाईतकर यांनी सांगितले की, सत्याग्रही विचारधारा मासिक निमित्ताने गांधी विचार, प्रसार मागील ३४ वर्षापासून सुरू आहे याचा अर्थ गांधी यांनी मांडलेला विचार अद्याप मेलेले नाही हे सिद्ध होते. आज ही हा विचार जनते मध्ये जागृत आहे, विचार कधी मरत नसतो. सनातनी विचार आणि गांधी विचार यात तफावत असून सनातनी विचार याला हिंसाचा आधार आहे. गांधी यांनी हिंदुत्वाची उदारमतवादी भूमिका मांडली ते धर्मनिरपेक्ष होते. ज्या गांधी यांनी अहिंसा विचार मांडला त्याविरोधात काही जणांनी भूमिका मांडली. अलीकडच्या काळात सर्वात हिंसक शहर म्हणून पुण्याची आता ओळख निर्माण होऊ लागली आहे. हिंसाला सत्तेचे पाठबळ मिळत आहे. सरसंघचालक यांनी विजय दशमीला नागपूरला जे भाषण केले त्यात कायद्याचे पालन करू सांगितले पण त्यांच्या ज्या इतर संघटना आहे यांच्याकडून हिंसा सुरू त्याचा निषेध व्यक्त केला नाही.मूकपणे हिंसा मान्य करणारा हा विषय आहे. दिल्ली येथील स्वयंघोषित ब्रह्मांडनायक पंतप्रधान यांनी पटेल विरुद्ध नेहरू, गांधी विरुद्ध बोस असे वाद विनाकारण निर्माण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न नियोजनबद्ध सुरू केला आहे. मूठभर लोकांच्या हाती सत्ता केंद्रित ठेवण्याचा जो विचार आहे तो दूर लोटला पाहिजे.
प्रा. जयदेव डोळे म्हणाले, ३५ वर्षापूर्वी कुमार सप्तर्षी औरंगाबाद याठिकाणी आले होते आणि त्यांनी “सत्याग्रही विचारधारा” दिवाळी अंक काढण्याचे निश्चित केले होते. सत्याग्रही विचारधारा विरुद्ध सनातनी विचारधारा हा संघर्ष आता सुरू झाला आहे. महात्मा गांधी यांच्या झंझावात पुढे सनातनी विचारधारा टिकू शकली नाही. अस्पृश्यता विरोधात गांधी यांनी १९२५ साली सत्याग्रह सुरू केला. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील विरोधी विचारधाराचा सुरू झाला. यंदा त्यांचा शताब्दी महोत्सव सुरू आहे. संघाचा चेहरा सत्तेसाठी आणि प्रसिद्धीसाठी आसुसलेला आहे हे प्रखरतेने आज जाणवत आहे. जी संस्था सरकार दरबारी नोंदणी नाही, आधारकार्ड नाही त्यांची शताब्दी धूमधडाक्यात साजरी होते.देशात अनेक विद्यापीठ शताब्दी पूर्ण करतात पण त्याबाबत गाजावाजा होत नाही. सत्तेवर बसलेले लोक सतत अपप्रचार करत आहे. सत्याग्रही विचार टिकून ठेवण्याचे काम डॉ. सप्तर्षी आणि सहकारी यांनी टिकवून ठेवले आहे. सांस्कृतिक राष्ट्रवाद, राजकारण, अर्थकारण, परराष्ट्र धोरण या चोहोबाजूने सनातनी विचारधारा यास मिळालेला लोकांचा पाठिंबा बनावट असल्याचे हळूहळू निष्पन्न होऊ लागले आहे. बनावट मतदार प्रकरण मांडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारची पोलखोल केली आहे.
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, जीवनात अनेक विसंगती मध्ये जीवन जगायचे कसे असा प्रश्न अनेक भारतीयां पुढे आहे. जन्माला मनुष्य जातीने येतो पण जातीमुक्त झाल्यावरच भारतीयत्व निर्माण होते. भारतीय स्वातंत्र्य लढा हा अहिंसेने झाला होता. जे हिंसक कृत्य करणारे होते ते काळाच्या प्रवाहात लुप्त झाले.जी गोष्ट नैसर्गिक असते ती काळाच्या ओघात टिकून राहते त्यामुळे सत्य, अहिंसा, सर्वधर्म समभाव यावर आधारित गांधी विचार टिकला पाहिजे. ब्राम्हणवाद हा करमणुकीचा विषय नाही तर गंभीर गोष्ट आहे. स्वतःला विशेषणे लावून घेण्यात त्यांना धन्यता वाटते. सर्व जातीत विषारी पद्धतीचे ब्राम्हणय आणले गेले आहे. त्यामुळेच अहिंसा, बंधुत्व आधारित सत्याग्रही विचारधारा ही निरंतर चालणारी आहे.
सत्याग्रही मासिकाचे उपसंपादक अभय देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लक्ष्मीकांत देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.