स्पेशॅलिटी केमिकल्सचे एकात्मिक उत्पादन करणारी कंपनी प्रासोल केमिकल्स लिमिटेडने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (SEBI) दाखल केला आहे. ही कंपनी स्पेशॅलिटी केमिकल्स क्षेत्रातील अत्यंत विविधीकृत खेळाडू मानली जाते. 31 जुलै 2025 पर्यंत कंपनीकडे 150 हून अधिक स्पेशॅलिटी केमिकल उत्पादने, 1,107 ग्राहक असून, ती आपली उत्पादने 69 देशांना निर्यात करते.
या आरंभिक सार्वजनिक समभाग विक्रीत (IPO) प्रति इक्विटी शेअर ₹2 दर्शनी मूल्यावर ₹80 कोटींची नवीन इश्यू आणि विद्यमान भागधारकांकडून ₹420 कोटींच्या समभागांची विक्री (Offer for Sale – OFS) अशा एकूण ₹500 कोटींच्या इश्यूचा समावेश आहे.
नवीन इश्यूतून मिळणारे निव्वळ उत्पन्न कंपनीने घेतलेल्या ₹60 कोटींच्या कर्जफेडीसाठी, तसेच सामान्य कॉर्पोरेट गरजांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे. या कर्जफेडीमुळे कंपनीच्या बॅलन्सशीटवरील भार कमी होणार असून, आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल, असा कंपनीचा दावा आहे.
1992 मध्ये स्थापन झालेली आणि नवी मुंबई येथे मुख्यालय असलेली प्रासोल केमिकल्स कंपनी अॅसिटोन व फॉस्फरस-आधारित स्पेशॅलिटी केमिकल्स, तसेच जटिल आणि भिन्न रसायनशास्त्रावर आधारित इतर स्पेशॅलिटी केमिकल्सचे उत्पादन करते. कंपनीकडे विविध टप्प्यांवर विकसित होत असलेली 40 उत्पादने पाइपलाइनमध्ये आहेत, त्यापैकी 9 उत्पादनांनी पायलट स्टेज पार केला आहे. प्रासोल केमिकल्स ही भारत सरकारकडून प्रमाणित 3 Star Export House असून, तिचे नेटवर्क Asia-Pacific (APAC), North America, South America आणि Europe या प्रदेशांमध्ये पसरलेले आहे.
प्रासोल केमिकल्सची अॅसिटोन-आधारित स्पेशॅलिटी केमिकल्समध्ये Arkema, Evonik, TASCO, Solvay यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा आहे, तर फॉस्फरस डेरिव्हेटिव्हजमध्ये कंपनीची स्पर्धा Hubei Xingfa, Liaoning Ruixing, Excel Industries यांच्याशी होते. मात्र, देशांतर्गत बाजारपेठेत अॅसिटोन-आधारित स्पेशॅलिटी केमिकल्स उत्पादकांची संख्या कमी असल्याने प्रासोलला तुलनेने मर्यादित स्पर्धा आहे.
31 जुलै 2025 पर्यंत कंपनीच्या विस्तृत उत्पादन पोर्टफोलिओमध्ये 150 हून अधिक स्पेशॅलिटी केमिकल्सचा समावेश होता. यात 21 अॅसिटोन-आधारित उत्पादने, 53 फॉस्फरस-आधारित उत्पादने, तसेच 76 इतर कस्टमाइज्ड केमिकल्सचा समावेश आहे. या कस्टमाइज्ड उत्पादनांमध्ये सरफॅक्टंट्स, परफॉर्मन्स अॅडिटिव्हज, इथर्स, एस्टर्स, पॉलिमर्स आणि अॅसिड्स यांचा समावेश होतो.
प्रासोल केमिकल्सने देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विविधीकृत आणि प्रतिष्ठित ग्राहकवर्गाशी दीर्घकालीन संबंध प्रस्थापित केले आहेत. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये अॅलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड, भारत रसायन लिमिटेड, क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड, क्रोडा इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड, घार्दा केमिकल्स लिमिटेड, जीएसपी क्रॉप सायन्स लिमिटेड, लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रॉसारी बायोटेक लिमिटेड आणि सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेड यांचा समावेश होतो.
आगामी काळात आणि विविध अनुप्रयोग उद्योगांमध्ये उत्पादनांच्या मागणीतील अपेक्षित वाढ लक्षात घेऊन, कंपनीने आपली उत्पादन क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्रातील खोपोली आणि महाड येथील विद्यमान युनिट्सची क्षमता वाढवून, त्यांचे उत्पादनक्षमतेतील अडथळे दूर करण्याचा (debottlenecking) प्रस्ताव आहे. याशिवाय, कंपनी ल्युब्रिकंट अॅडिटिव्हज, कन्स्ट्रक्शन केमिकल्स आणि मायनिंग केमिकल्ससाठी स्वतंत्र अॅप्लिकेशन टेस्टिंग लॅबरोटरी विकसित करणार आहे.
31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात (FY25) प्रासोल केमिकल्स लिमिटेडने दमदार कामगिरी नोंदवली. कंपनीच्या ऑपरेशन्समधील महसूल 15.5% ने वाढून ₹1,012.49 कोटी झाला, जो FY24 मधील ₹876.56 कोटी होता. कंपनीचा ऑपरेटिंग ईबीआयटीडीए 44.9% वाढून ₹87.76 कोटी झाला, जो मागील वर्षातील ₹60.53 कोटी होता. हे परिणाम सुधारलेल्या ऑपरेशनल कार्यक्षमतेचे आणि मार्जिन वाढीचे प्रतीक आहेत. याशिवाय, कंपनीचा करपश्चात नफा (PAT) FY25 मध्ये ₹43.56 कोटींवर गेला, जो FY24 मधील ₹18.13 कोटी होता, म्हणजेच नफा दुपटीहून अधिक वाढला.
विशेष अनुप्रयोगांसाठी ओळखले जाणारे स्पेशॅलिटी केमिकल्स यांनी 2024 मध्ये जागतिक केमिकल उद्योगाच्या एकूण बाजारपेठेत 20% वाटा मिळवला होता. 2029 पर्यंत हा वाटा 21–23% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामागे कस्टमाइज्ड आणि हाय-परफॉर्मन्स सोल्युशन्सची वाढती मागणी हे कारण आहे. स्पेशॅलिटी केमिकल्सचा जागतिक बाजार CAGR 8% दराने वाढून 2029 पर्यंत $1,748 बिलियनपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
स्पेशॅलिटी केमिकल्स उद्योगातील एक महत्त्वाचा प्रवेश अडथळा म्हणजे उत्पादन पुरवठा सुरू करण्यापूर्वी ग्राहकाकडून नोंदणी आणि मंजुरी मिळवणे आवश्यक असते. ही मंजुरीची सायकल साधारणपणे 1 ते 4 वर्षे चालते. या प्रक्रियेत उत्पादनातील शुद्धता आणि अशुद्धतेची सखोल चाचणी, ग्राहकांच्या गरजेनुसार कस्टमायझेशन, कार्यक्षमतेची पडताळणी, शेल्फ-लाइफ अभ्यास व एंड-युज अॅप्लिकेशन टेस्टिंग यांचा समावेश होतो.
या इश्यूचा एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर डीएएम कॅपिटल अॅडव्हायझर्स लिमिटेड आहे, तर केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे ऑफरचे रेजिस्ट्रारर आहेत. प्रासोल केमिकल्सचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) वर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.