शिवसृष्टीच्या वतीने १९ व २० ऑक्टोबर रोजी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन

तारां कित Avatar

 

पुणे, दि. १६ ऑक्टोबर, २०२५ : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे निर्माणाधीन असलेल्या शिवसृष्टीमध्ये येत्या १९ व २० ऑक्टोबर रोजी दोन दिवाळी पहाट अंतर्गत स्वर संजीवनी व श्रुतीलय दिवाळी स्वरपहाट या संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार यांनी कळविली आहे. दोन्ही दिवशी पहाटे ५.३० वाजता शिवसृष्टीच्या प्रांगणात सरकारवाडा येथे सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले आहेत. कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार असून काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील याची कृपया नोंद घ्यावी.

 

१९ ऑक्टोबर रोजी संपन्न होणारा स्वर संजीवनी हा कार्यक्रम डॉ. सचिन खैरनार, डॉ. नितीन तांबे, डॉ. हर्षल कुलकर्णी, डॉ. परेश जोशी, डॉ. स्मिता राहतेकर, डॉ. वैदेही बापट, डॉ. अनघा लोखंडे, डॉ. तेजश्री गुरव व पूर्वा काळे हे गायक कलाकार सादर करतील तर संजय महाजन व डॉ. रश्मी खैरनार हे कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी संजय पारखी (संवादिनी), विनायक बेल्हेकर (तबला) हे कलाकार साथसंगत करतील.

 

तर २० ऑक्टोबर रोजी ‘श्रुतिलय’ दिवाळी स्वरपहाट कार्यक्रमात रसिका जोशी, अपर्णा देशपांडे आणि सहकार यांचे सादरीकरण होईल. यामध्ये रसिका जोशी, अपर्णा देशपांडे, ऋषिकेश गाडगीळ व गार्गी नांदुर्डीकर हे कलाकार गायन सादर करतील तर ओंकार पाटणकर व अक्षय पाटणकर हे वादन साथ करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे निवेदन हे श्रेया पाटगावकर करतील, तर ध्वनी व्यवस्था उमेश फाटक यांची असणार आहे,असेही पवार यांनी कळविले

आहे.

Tagged in :

तारां कित Avatar