पुणे, भारत – १६ ऑक्टोबर २०२५: रोल्स रॉयसने आपल्या पर्ल ७०० आणि पर्ल १०एक्स इंजिनसाठी फॅन ब्लेड्सची निर्मिती आणि पुरवठ्यासाठी भारत फोर्ज लिमिटेडसोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
देशांतर्गत क्षमता उभारणी व धोरणात्मक स्थानिक भागीदारी करण्याप्रती रोल्स-रॉयसच्या वचनबद्धतेमध्ये हा करार एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारतातून आपले पुरवठा शृंखला सोर्सिंग २०३० सालापर्यंत दुपटीने वाढावे यासाठीच्या रोल्स-रॉयसच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. रोल्स-रॉयसच्या बर्लिनजवळच्या दहलेविट्स (Dahlewitz) कारखान्यात या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन कंपन्यांमधील दीर्घकालीन सहयोग या करारामुळे अधिक मजबूत झाला आहे, तसेच प्रिसिजन एरोस्पेस कम्पोनंट्सची विश्वसनीय जागतिक पुरवठादार हे भारत फोर्जचे स्थान अधोरेखित केले आहे.
रोल्स-रॉयस इंडियाचे ट्रान्सफॉर्मेशन विभागाचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट शशी मुकुंदन यांनी या भागीदारीविषयी सांगितले, “भारत फोर्जसोबतची भागीदारी पुढे वाढवून ‘मेक इन इंडिया’ व्हिजनला पुढे नेताना रोल्स-रॉयसला खूप आनंद होत आहे. हा नवीन करार भारतात जागतिक दर्जाच्या उत्पादन क्षमता विकसित करण्याप्रती आमची बांधिलकी दर्शवतो, जागतिक पुरवठा शृंखला इकोसिस्टिममध्ये अत्याधुनिक एरोस्पेस कम्पोनंट्स पुरवण्याचे दोन्ही कंपन्यांचे एकसमान ध्येय आम्ही यातून पुढे नेत आहोत.”
भारत फोर्ज लिमिटेडचे व्हाईस चेयरमन आणि जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित कल्याणी यांनी सांगितले, “रोल्स रॉयससोबतच्या भागीदारीचा हा विस्तार अभियांत्रिकी कौशल्ये आणि दीर्घकालीन सहयोगाप्रती आमची एकसमान बांधिलकी दर्शवतो. उच्च कामगिरी बजावणाऱ्या एव्हिएशनचे भवितव्य असलेल्या पर्ल इंजिनला पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटत आहे.”
रोल्स-रॉयस आणि भारत फोर्ज यांच्यातील भागीदारीची सुरुवात २०२० साली पर्ल ७०० प्रोग्रामसाठी सुटे भाग पुरवण्यापासून झाली. तेव्हापासून आजतागायत भारत फोर्ज पर्ल ७०० प्रोग्राममध्ये श्रेणीतील सर्वश्रेष्ठ गुणवत्ता आणि डिलिव्हरी कामगिरी साध्य करण्यासाठी रोल्स-रॉयससोबत खूप जवळून काम करत आहे. पहिले झिरो-डिफेक्ट फॅन ब्लेड २०२४ साली पुरवण्यात आले. नवीन कराराने ही व्याप्ती पुढे वाढवून त्यामध्ये पर्ल १०एक्स इंजिनचा समावेश केला आहे. अत्याधुनिक प्रपल्शन सिस्टिम पुरवण्यामध्ये भारत फोर्जची भूमिका त्यामुळे लक्षणीय प्रमाणात वाढली आहे.
बाजारपेठेत आघाडीवर असलेल्या पर्ल इंजिन परिवारामध्ये पर्ल १०एक्स हा सर्वात नवीन आणि सर्वात शक्तिवान सदस्य आहे. पर्ल इंजिन सध्या उपलब्ध असलेल्यांपैकी काही सर्वात मोठ्या, सर्वात वेगवान आणि सर्वात लांब रेन्ज असलेल्या बिझनेस जेट्सना शक्ती पुरवते. पर्ल १०एक्स इंजिनची खासियत आहे ऍडव्हान्स२ इंजिन कोर जे संपूर्ण बिझनेस एव्हिएशन क्षेत्रात सध्या उपलब्ध असलेले सर्वात सक्षम कोर आहे. त्यासोबत त्यामध्ये उच्च कामगिरी बजावणारी लो-प्रेशर सिस्टिम आहे, जी १८०००एलबीपेक्षा जास्त थ्रस्ट मिळवून देते.
रोल्स-रॉयसच्या भारतातील कारकिर्दीला तब्बल ९० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मजबूत धोरणात्मक स्थानिक भागीदारी, शैक्षणिक संस्थांसोबत ज्ञान व माहितीच्या देवाणघेवाणीसाठी सहकार्य, संयुक्त उपक्रम, मजबूत पुरवठा शृंखला, समृद्ध टॅलेन्ट पूल, अभियांत्रिकी क्षमता, डिजिटल उपाययोजना आणि सेवा वितरण क्षमता यांचा त्यामध्ये समावेश आहे. आज, १,४०० हून अधिक रोल्स-रॉइस इंजिन भारतीय हवाई दल, नौदल, तटरक्षक दल आणि लष्करासाठी विविध प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. त्यांच्या इकोसिस्टममध्ये ४,००० हून अधिक लोक कार्यरत आहेत, ज्यात जागतिक विकास कार्यक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या २,८०० अत्यंत कुशल अभियंत्यांचा समावेश आहे.
पर्ल ७०० प्रोग्रामच्या सुरुवातीपासून, भारत फोर्ज ही रोल्स-रॉयसची एक प्रमुख पुरवठादार आहे, आणि त्यांना सातत्याने उच्च-गुणवत्तेचे मशीन्ड ब्लेड पुरवत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, पर्ल इंजिन परिवारात वापरल्या जाणाऱ्या अचूक एरोस्पेस कम्पोनंट्ससाठी हे प्रगत तंत्रज्ञान देणारी भारत फोर्ज ही भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी आहे. ही क्षमता अत्याधुनिक उत्पादन पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक एरोस्पेस उपाय प्रदान करण्याची कंपनीची वचनबद्धता दर्शवते. भारत फोर्ज जगभरातील आघाडीच्या ओईएम आणि प्रथम श्रेणी पुरवठादारांसोबत दीर्घकालीन भागीदारी निर्माण करण्यावर धोरणात्मक लक्ष केंद्रित करून गुंतवणूक करण्यास आणि पुढील स्तरावर वाढ करण्यास उत्सुक आहे. कंपनी हाय-प्रिसिजन उत्पादन, नावीन्यपूर्णता आणि शाश्वत एरोस्पेस सोल्यूशन्समध्ये आपल्या क्षमता वाढवण्यासाठी वचनबद्ध
आहे.