पुणे, दि. 16 – पुणे सहकारी बँकेवर लावलेले सर्वसमावेशक निर्बंध (ऑल इन्क्लुझिव्ह डायरेक्शन्स – एआयडी) आज रिझर्व्ह बँकेने पूर्णपणे मागे घेतल्याने बँकेचे सर्व व्यवहार आता नियमितपणे सुरु होत असल्याची माहिती प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा प्रगती वाबळे (सहकार विभागाच सहाय्यक निबंधक, पुणे शहर) यांनी आज येथे दिली. बँकेच्या प्रशासक मंडळात पांडुरंग राऊत, अॅड. विकास रासकर, भालचंद्र कुलकर्णी, राहुल पारखे व नेहा केदारी यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी बँकेवर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेबरोबर नुकत्याच झालेल्या टास्कफोर्स बैठकीत राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी देखील या बँकेचे नियमित व्यवहार सुरू व्हावेत, यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
मार्च, 2023 मध्ये पुणे सहकारी बँकेवर निर्बंध लावण्यात आले होते, त्यामुळे ठेवी स्विकारण्यावर आणि कर्ज व्यवहार करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. आता सर्व प्रकारच्या बँकिंग व्यवहाराला पुन्हा सुरुवात होत असल्याने बँकेची आर्थिक स्थिती सक्षम होईल, असा विश्वास प्रशासक मंडळाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.
पुणे सहकारी बँकेची स्थापना पुणे शहराचे माजी खासदार स्व. ल. सो. तथा अण्णा जोशी यांच्या नेतृत्वाखाली 2003 मध्ये झाली होती. सध्या बँकेच्या पुण्यात हडपसर व बाणेर अशा 2 शाखा असून बँकेकडे ठेवी रु. 9 कोटी 50 लाखांच्या आहेत तर कर्जे रु. 5 कोटी 50 लाखांची आहेत. प्रशासक मंडळातील सर्व सदस्य हे साखर उद्योग, बँकिंग, सहकार, शेती यामधील अनुभवी असून त्यांच्या प्रयत्नातून नवीन सभासदांकडून सुमारे रु. 2 कोटींचे भाग भांडवल जमा झाले आहे, त्याचबरोबर थकबाकी वसूली देखील चांगली होत असल्याने बँकेचे नक्त मूल्य (नेट वर्थ) अधिक झाले आहे तर इतरही निकषांमध्ये बँकेने चांगली प्रगती केली आहे.
———————–