पुणे विभागात पात्र मतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करा – अपर आयुक्त तुषार ठोंबरे

तारां कित Avatar

पुणे, दि. १६: पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रमाअंतर्गत ६ नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे, त्यामुळे विभागातील माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ तसेच शासकीय कार्यालयातील पात्र मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची कार्यवाही येत्या ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश अपर आयुक्त तुषार ठोंबरे यांनी दिले.

 

 

 

विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीच्या अनुषंगाने पुणे विभागस्तरीय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, कृषी विभागातील अधिकारी, विद्यापीठांचे कुलसचिव, महाविद्यालयीन प्राचार्य, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांकरिता आयोजित प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते.

 

 

 

यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण परिषदेच्या महासंचालक वर्षा उंटवाल लड्डा, पुणे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. अशोक उबाळे, तंत्र शिक्षण सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, अमरजीत पाटील, बाबुराव जाधव, पुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी संगीता बांगर, विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. बैठकीस सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी आणि अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी, शैक्षणिक संस्थेचे प्रतिनिधी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

 

 

श्री. ठोंबरे म्हणाले, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी – नोव्हो) तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी सुरू आहे. सन २०२६ मध्ये पुणे विभागात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त असून, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते मतदार नोंदणीचे काम करीत आहेत.

 

 

 

सन २०२६ मध्ये होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. या कार्यक्रमाअंतर्गत यापूर्वीच्या पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयादीत नाव समाविष्ठ असले तरी आता पात्र मतदारांचे नव्याने मतदार यादीत नाव समाविष्ट करावे, असे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. मतदार नोंदणी करताना सर्व कागदपत्रांची तपासणी करुनच नोंदणी करावी. नवीन मतदार नोंदणीचे अर्ज मतदार नोंदणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहील, याबाबत दक्षता घ्यावी. मतदारांना मतदार नोंदणी करण्याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन करावे. मतदार नोंदणीकरिता एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याबाबत नोंद घ्यावी.

 

 

 

पुणे विभागात मतदार नोंदणी कार्यक्रमाबाबत पदवीधर आणि शिक्षकांना माहिती होण्यासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती करावी. शासकीय कार्यालयातील सर्व पदवीधर अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंदणी करून सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा. शिक्षक मतदारसंघाकरिता शैक्षणिक संस्थेतील केवळ शिक्षकांचे मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यात आल्याची खात्री करुन घ्यावी, शिक्षकेतर कर्मचारी, शिपाई यांचे नाव नोंद करु नये. मतदार नोंदणीबाबत आपल्याला शंका असल्यास पदनिर्देशित अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

 

 

मतदार नोंदणी प्रक्रिया १ जानेवारी पासून निरंतर सुरु राहणार असून यामध्येही मतदार नोंदणी करता येणार आहे. एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही श्री. ठोंबरे म्हणाले.

 

 

 

प्रशिक्षण सत्रात मतदार नोंदणीचे टप्पे, मतदार नोंदणीचे अर्ज भरताना घ्यावयाची काळजी, अर्जाची छाननी प्रक्रिया, मतदार अर्हता, शैक्षणिक कागदपत्रे, मतदार नोंदणी जनजागृती कार्यक्रम, संदर्भ परिपत्रके, शासन निर्णय, आदेश आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

 

 

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघ: मतदार नोंदणीची प्रक्रिया पार पाडताना प्रशासन, सर्व संबंधित यंत्रणा तसेच विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आदींनी समन्वय साधून काम करावे. लोकशाही बळकटीकरणाकरिता विभागातील अधिकाधिक पात्र पदवीधर आणि शिक्षकांनी मतदार नोंदणी कार्यक्रमात सक्रीयपणे सहभागी होवून आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावा.

 

0000

Tagged in :

तारां कित Avatar