पुणे, दि. 16 ऑक्टोबर (जिमाका, वृत्तसेवा): गडचिरोली जिल्ह्यातील मुरखेल (ता. चार्मोशी) येथील आदिवासी विद्यार्थी विशाल सुनील मेश्राम यांनी परदेशात उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांची इंग्लंडमधील नामांकित युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल येथे एम.एससी. (पब्लिक पॉलिसी) या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
श्री. विशाल मेश्राम हे आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृह, कोरेगाव पार्क, पुणे येथील माजी विद्यार्थी असून सध्या ते अजिम प्रेमजी विद्यापीठ, बेंगळुरू येथे पदवी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या प्रतिभा, परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. श्री. मेश्राम यांची ही कामगिरी आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी ठरली असून, उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करणारी आहे, असे वसतिगृहाचे गृहपाल उदय महाजन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.