पुणे : वाचन संस्कृतीचा प्रसार आणि समाजात वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यास (एनबीटी) इंडिया यांनी “बुक्स ऑन व्हील” ही अभिनव फिरती पुस्तक प्रदर्शनी बस सुरू केली आहे. ही बस पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी १६ ऑक्टोबर ते २१ डिसेंबर या कालावधीत फिरणार असून, कायमस्वरूपी पुण्यासाठी राहणार आहे या उपक्रमाद्वारे ग्रामीण व शहरी भागातील लोकांना पुस्तकांच्या माध्यमातून विचार, संवेदना आणि संस्कार यांचा संगम अनुभवण्याची संधी मिळणार आहे.हा उपक्रम वाचनाची चळवळ वृद्धिंगत करण्यासोबतच वाचक, विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी ज्ञान, प्रेरणा आणि मनोरंजनाचा सुंदर संगम ठरणार आहे.
आगामी पुणे पुस्तक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या बसचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. यावेळी एनबीटीचे संचालक युवराज मलिक, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, उद्योजक विशाल चोरडिया, डॉ. विनोद गायकवाड, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष किरण ठाकूर, एमएनजीएलचे अधिकारी कुमार शंकरन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेष कुलकर्णी आदी उपस्थित होते
या फिरत्या बसमधून मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांतील चार हजार हून अधिक पुस्तकं वाचकांच्या भेटीस येणार आहेत. ग्रामीण भागातील आणि शहरातील वाचकांना दर्जेदार साहित्य सहज उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामध्ये पुस्तकांच्या विशेष मालिका असून, त्यामध्ये
भारत – देश आणि लोक, तरुण भारती, लोकप्रिय सामाजिक विज्ञान, विश्व साहित्य, राष्ट्रीय चरित्रमाला, लोकसाहित्यमाला, प्रधानमंत्री युवा मेंटॉरशिप योजना, इंडिया @75, नेहरू बाल पुस्तकालय, द्विभाषिक पुस्तकमाला आणि आशिया-पॅसिफिक सहप्रकाशन या मालिकांचा समावेश आहे.या vanमध्ये एकूण पाच सदस्यांची टीम असून, त्यात चार सदस्य दिल्लीहून आलेले आहेत. संपूर्ण उपक्रमाचे आयोजन शैलेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
….
‘बुक्स ऑन व्हील’ बसची आकर्षक वैशिष्ट्ये:
– आतील व बाह्य बाजूस विस्तृत पुस्तक प्रदर्शन
– टीव्ही स्क्रीनद्वारे एनबीटीच्या नव्या उपक्रमांची माहिती
– बाहेरील डिजिटल डिस्प्ले – आकर्षक आणि माहितीपूर्ण
– दोन एसी यंत्रणा – आरामदायक पुस्तक खरेदीचा अनुभव
– सर्व पुस्तकांवर १०% सवलत
….
लोकप्रिय पुस्तके
….
आपली संसद, औषधी वनस्पती, आपले पर्यावरण, मानवी हक्क, लोकशाही, इंडियन सोसायटी, तोत्तोचान, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकांचा समावेश आहे.
…
लहान वाचकांसाठी
…
सत्याचा शोध, प्रदूषण, प्राणीसंग्रहालयात भेट, वीरों की कहानियां आणि द वर्ड ऑफ ट्रिज ही ज्ञानवर्धक पुस्तके उपलब्ध असतील.
…..
‘बुक्स ऑन व्हील’ ही केवळ एक बस नसून, चालते फिरते पुस्तक प्रदर्शन आहे. या बसच्या माध्यमातून “वाचनाची गोडी लागून, वाचन चळवळ समृद्ध होणार आहे. ही बस पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात फिरणार असल्याने, शाळा आणि महाविद्यालयांना फायदेशीर ठरणार आहे.
– चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री