पुणे पुस्तक महोत्सव २०२५ : वाचन, संस्कृती आणि सर्जनशीलतेचा सोहळा! १३ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भरणार 

तारां कित Avatar

 

 

पुणे : वाचन संस्कृतीचा उत्सव, भारतीय परंपरेचा गौरव आणि आधुनिक साहित्यिक अभिव्यक्तीचा संगम ठरणारा ‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’ यंदा तिसऱ्या वर्षी अधिक वैविध्यपूर्ण आणि भव्य स्वरूपात १३ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. भारतीय भाषांमधील पुस्तकांची ८०० दालने, लीटरेचर फेस्टिव्हल, बालकांसाठी चिल्ड्रेन कॉर्नर, लेखकांसाठी ऑर्थर कॉर्नर, दररोज पुस्तकांची प्रकाशने, सांस्कृतिक कार्यक्रम अशा एकापेक्षा एक कार्यक्रमांनी यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव रंगणार असल्याची माहिती राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

 

राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (एनबीटी ) वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मलिक आणि पांडे यांनी माहिती दिली. या महोत्सवाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि समर्थ युवा फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाने या कार्यक्रमांना पूर्ण पाठिंबा दिला आहे.

यंदा १५ लाखांहून अधिक वाचक व पुस्तकप्रेमींच्या भेटीची अपेक्षा असून, काही कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.

 

पुणे पुस्तक महोत्सवाचे हे तिसरे पर्व असून दरवर्षी पुस्तक महोत्सव अधिकाधिक भव्य होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन १३ डिसेंबरला देशातील मोठ्या व्यक्तिमत्वाच्या हस्ते होईल. गेल्या वर्षी सर्व भारतीय भाषांमधील पुस्तकांची ७०० दालने होती. यांना ती संख्या वाढून ८०० झाली आहे. गेल्या वर्षी लिटरेचर फेस्टिवल हे तीन दिवसांसाठी होते. त्याला पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्यामुळे यंदाचे लिटरेचर फेस्टिवल हे सहा दिवसांचे राहणार असून, त्यात तीन दिवस मराठी भाषेतील साहित्यिक, शैक्षणिक, वैचारिक कार्यक्रमांना राखीव असणार आहे. उर्वरित तीन दिवस हे विविध भाषेतील कार्यक्रमांना राहणार आहे. या ‘लीट फेस्टिव्हल’साठी नामांकित साहित्यिक, लेखक, पत्रकार, कलाकारांना आमंत्रित करण्यात आल्या असून, लवकरच त्याबाबतची माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. बालकांसाठी चिल्ड्रेन कॉर्नर राहणार असून, त्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कार्यशाळा, नावीन्यपूर्ण उपक्रमाची रेलचेल राहणार आहे. ‘जॉय ऑफ रीडिंग’ या विषयावर छायाचित्रकारांची स्पर्धाही आयोजित केली आहे.त्याचप्रमाणे खवय्यांसाठी खाद्यपदार्थांचे ३० पेक्षा अधिक स्टॉल राहणार आहे. महोत्सवाचा समारोप २१ डिसेंबरला होईल, असे मलिक आणि पांडे यांनी सांगितले.

पुणे पुस्तक महोत्सवात होणाऱ्या सर्व साहित्यिक, सांस्कृतीक, वैचारिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुस्तक महोत्सव आहे. या महोत्सवाला अधिक भव्य करण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

– युवराज मलिक, संचालक, राष्ट्रीय पुस्तक न्यास

पुणे पुस्तक महोत्सव २०२५ हा फक्त पुस्तकांचा मेळा नाही, तर तो ज्ञान, संस्कृती, सर्जनशीलता आणि राष्ट्रीय भावनेचा उत्सव आहे. हा पुणेकरांचा महोत्सव असून, वाचन चळवळ दिवसेंदिवस समृद्ध होत आहे. त्यामुळे सर्व पुस्तकप्रेमी, वाचनप्रेमी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी या अद्वितीय महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

– राजेश पांडे, मुख्य संयोजक , पुणे पुस्तक महोत्सव

….

Tagged in :

तारां कित Avatar