*महापालिका अतिरिक्त आयुक्तांसह खातेप्रमुखांची कसबा मतदारसंघात बैठक, स्वच्छ, सुंदर विकसित कसबा” अभियानाला गती*
पुणे ( दि१६) : कसबा विधानसभा मतदारसंघाला भारतातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर मतदारसंघ बनवण्याच्या ध्येयाने सुरू असलेल्या ‘स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा’ अभियानाला गती देण्यासाठी आज विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयात आमदार हेमंत रासने यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मतदारसंघ संपूर्णपणे कचरामुक्त, स्वच्छ आणि आदर्श मतदारसंघ बनवण्यासाठी प्रशासन, नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय, तसेच २६ ऑक्टोबरपासून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ९० दिवस’ या विशेष अभियानाच्या तयारीसंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. एम. जे. प्रदीपचंद्रण, श्री. पृथ्वीराज बी.पी., श्री. ओमप्रकाश दिवटे, महापालिकेचे सर्व विभागप्रमुख, भाजपा मंडल अध्यक्ष श्री. अमित कंक, श्री. प्रशांत सुर्वे, श्री. छगन बुलाखे, शहर महिला आघाडी अध्यक्षा सौ. मनिषाताई लडकत, शहर सरचिटणीस श्री. राघवेंद्र मानकर, समन्वयक श्री. राजेंद्र काकडे, तसेच महापालिकेचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी, मा. नगरसेवक आणि भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, रस्ते आणि ड्रेनेज समस्या प्राथमिकतेने सोडवणे तसेच बूथस्तरीय स्वच्छता स्पर्धा आयोजित करून नागरिकांचा सहभाग वाढवणे. या अभियानातून “स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा” घडवण्यासाठी राबवण्याचा प्रकल्पांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
याबद्दल बोलताना हेमंत रासने म्हणाले, “कसबा विधानसभा मतदारसंघ हे पुण्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक हृदय आहे. या भागाला ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित’ बनवणे ही केवळ मोहिम नसून प्रत्येक कसबाकराचा संकल्प आहे. प्रशासन, नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून नक्कीच ‘कचरामुक्त आणि आदर्श कसबा’ घडू शकतो”.