पुणे, दि. 16 ऑक्टो – आज बऱ्याचश्या शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण शिरल्याने शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, त्यातच काही राजकीय नेत्यांनी स्वार्थापोटी शिक्षण संस्था ताब्यात घेतल्या आहेत, हे आपण सर्वांनी मिळून रोखायला हवे, असे रोखठोक प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी आज येथे केले. पुणे विद्यार्थी गृहाचे कुलगुरु स्व. दादासाहेब केतकर यांच्या 75 व्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत “शिक्षण : आव्हाने आणि संधी” या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोर्हाडे, कार्यवाह संजय गुंजाळ व कोषाध्यक्ष कृष्णाजी कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डॉ. निरगुडकर पुढे म्हणाले की, आदर्श नागरिक घडवणाऱ्या पवित्र मंदिरांवरच आज भ्रष्ट माणसे हल्ला करत आहेत. पूर्वी आपल्या देशावर बाहेरचे आक्रमक होते, त्यांनी प्रदेश, धर्म, जात आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेवर हल्ले केले, त्यातूनच आपल्या समाजात भेदभाव निर्माण झाले. आक्रमकांनी आपल्या देशाविषयीचा अभिमान नष्ट केला, आपल्यातच भांडणे लावली. शिक्षण, बुध्दीमत्ता ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी कुणीही लुटून नेऊ शकत नाही. त्यासाठीच शिक्षणाचा पाया भक्कम असायला हवा. नवीन शैक्षणिक धोरणात खूप काही चांगले आहे, मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कऱणारे शिक्षक कुठेतरी कमी पडतांना दिसत आहेत. मनोरंजनाच्या नावाखाली चालणाऱ्या अनिष्ट गोष्टींना दूर सारुन विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले गेले तरच भारत खऱ्या अर्थाने विश्वगुरु होईल. आज भारताची दखल सगळ्या जगाला घ्यावी लागत आहे, हे मान्य करावे लागेल. सन 1909 म्हणजे स्थापनेपासून पुणे विद्यार्थी गृहाचे संपूर्ण व्यवस्थापन माजी विद्यार्थी सांभाळत आहेत, इथे कोणत्याही राजकारण्यांचा समावेश नाही, ही कौतुकाची बाब आहे, असे गौरवोद्गारही यावेळी त्यांनी काढले.
यावेळी संस्थेचे उपकार्याध्यक्ष सुभाष जिरगे, अमोल जोशी, संचालक सुनिल रेडेकर, राजेंद्र कडूसकर, आनंद कुलकर्णी, रमेश कुलकर्णी, दिनेश मिसाळ, सल्लागार भालचंद्र कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी अत्रे यांनी केले तर संस्थेचे कार्यवाह संजय गुंजाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
—–
🙏