पुणे : अनाथ मुलांना आर्थिक गरज असतेच, पण त्याहीपेक्षा आपुलकी, प्रेम आणि कौतुकाची थाप यासाठी ही मुले भुकेलेली असतात. त्यामुळे या मुलांचा उद्या आपल्याला जपायचा असेल, तर त्यांना भरघोस प्रेम द्यायला हवे, या भावनेने पुणेकरांनी एकत्र येत श्रीवत्स संस्थेत अनोखा उपक्रम राबविला. पुण्यातील विविध सामाजिक संस्था आणि गणेशोत्सव मंडळांनी एकत्र येत ससून रुग्णालय आवारातील श्रीवत्स संस्थेतील चिमुकल्यांसोबत आपुलकीची दिवाळी साजरी केली.
शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सहयोगी संस्थांतर्फे दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला घेता यावा, याकरीता आयोजित आपुलकीची दिवाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शि.प्र.मंडळी नियामक मंडळ सदस्य सुधीर काळकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, उद्योजक रसिक नहार, संस्थेचे सचिन अभ्यंकर, मेहुणपुरा मंडळाचे आनंद कावणकर, पराग ठाकूर, शिरीष मोहिते, रोहन जोशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यंदा ३२ वे वर्ष आहे. विविध गाण्यावर नृत्य सादर करीत आपल्या मनातील भावना या चिमुकल्यांनी उपस्थितांसमोर मांडल्या. क्लारोनेट वादक वसंत पवार यांना पन्नास हजार रुपये मदत म्हणून देण्यात आले. वस्तुरूपी पंचवीस हजार रुपये मदत करण्यात आली. श्रीवत्स संस्थेला आवश्यक असणारी आर्थिक व वस्तुरुपी भेट देण्यात आली. गायिका रश्मी मोघे आणि राहुल जोशी यांनी यावेळी गायन केले.
महेश सूर्यवंशी म्हणाले, दिवाळी हा प्रकाशाचा आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. श्रीवत्स सारख्या संस्थेमध्ये समर्पित भावनेने मुले घडविण्याचे काम केले जात आहे. दिवाळी हा कृतज्ञतेचा उत्सव असल्याने समाजाप्रती असलेली आपली भावना व कर्तव्य प्रत्येकाने काही ना काही माध्यमातून केले पाहिजे. सुधीर काळकर म्हणाले, लहान मुलांची उर्जा आपल्या प्रत्येकाला समाजात समर्पितपणे कार्य करण्याची प्रेरणा देते, असे त्यांनी सांगितले.
पराग ठाकूर म्हणाले, तब्बल ३१ वर्षांपूर्वी सुरु झालेला हा उपक्रम ५०० रुपये मदतीपासून सुरु झाला होता. आजमितीस या उपक्रमाला समाजातील विविध गणेशोत्सव मंडळे आणि दानशूरांकडून मोठया प्रमाणात सहाय्य मिळत आहे. समाजातील वंचित घटकांना गरजेच्या वस्तू देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्याचा प्रयत्न यामाध्यमातून होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह एलआयसी परिवार, इमर्सन कंपनी, सेवानिवृत्त एसटी अधिकारी, नूमवि मराठी शाळा, नवा विष्णू चौक नवरात्र उत्सव मंडळ, शनिपार मित्र मंडळ, कुंभोजकर मित्रपरिवार, जनता बँक मित्रपरिवार, आफळे अकादमी, सैनिक मित्र परिवार, हिंदू महिला सभा, मंदार ठाकूरदेसाई मित्र परिवार, अभेद्य वाद्य पथक, नहार परिवार आदी संस्थांनी उपक्रमात सहभाग घेतला होता.