पुणे -‘केवळ राजकारणच नव्हे तर प्रत्येकच क्षेत्रात पती-पत्नी दोघांनाही वेळ द्यावा लागतो. दोघांंनीही एकमेकांच्या कामांना समान प्रतिष्ठा देणे महत्त्वाचे आहे. कोणतीही महिला प्रेमापोटी निरपेक्ष भावनेने घर सांभाळून नोकरी, व्यवसायही करते. हेच सहजीवनााचे खरे वैशिष्ट्य आहे, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी व्यक्त केले. राजकीय नेत्यांच्या जीवनात पत्नीची भूमिका, सहकार्य मोलाचे आहेच. परंतु, नारी शक्ती कायद्यामुळे २०२९ नंतर ५० टक्के महिला राजकारणात येतील. त्यामुळेच पतीराजांना त्यांना समजून घेण्याची वेळ येणार आहे, हे विसरू नका,’ असेही त्या म्हणाल्या.
उन्मेष प्रकाशनातर्फे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सल्लागार, लेखिका डॉ. प्राची जावडेकर लिखित ‘पुणे-दिल्ली-पुणे’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झाले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रकाशक मेधा राजहंस व प्राची जावडेकर या वेळी उपस्थित होत्या.
‘पूर्णवेळ गृहिणी म्हणूनच महिलांकडे पाहिले जात असल्याने, आजही राजकारणात येणाऱ्या महिलांची संख्या कमीच आहे. पतीने एखाद्या विषयासाठी वाहून घ्यायचे ठरवले, तर पत्नी त्याला साथ देत घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळते. हे चित्र सर्वच विचारधारांच्या चळवळीत दिसते. प्राची जावडेकर यांनी प्रकाश जावडेकर यांच्यासोबतच्या सहजीवनातही हीच बांधिलकी जपली. या काळात किनाऱ्यावर न राहता प्रत्यक्ष प्रवाहात उतरून त्यांनी अनेक चढ उतार अनुभवले. त्यांच्या या संघर्षाचा,योगदानाचा जावडेकर कुटुंबीयांनी या पुस्तकातून गौरव केला आहे. प्राची यांनी कोणालाही न दुखावता त्यांनी उत्तमरित्या हा जीवनप्रवास रेखाटला आहे.असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.
‘जावडेकर कुटुंबीयांशी माझे ३० वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत. पक्षाच्या प्रतिकूल काळात अविचल निष्ठेने काम करत जावडेकरांसारखा सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचला. त्यात प्राची जावडेकर यांची साथ मोलाची होती. त्या प्रवासाचे हे शब्दचित्रण सर्वांसाठी मार्गदर्शक असून हे पुस्तक एक महत्त्वाचा दस्तावेज ठरेल,’ असे मोहोळ म्हणाले.
‘राजकारणात पूर्णवेळ काम करणे कठीण आहे. स्वत:चा खासगी वेळ सार्वजनिक कामासाठी देणे ही अवघड बाब आहे. परंतु, प्राची जावडेकर यांच्या खंबीर पाठिंब्याच्या जोरावर प्रकाश जावडेकर यांनी पूर्णवेळ पक्षासाठी, देशासाठी काम केले. त्यांच्या या प्रवासाच्या, संघर्षाच्या साक्षीदार, भागीदार असलेल्या प्राची यांनी लिहिलेले हे पुस्तक कुटुंबव्यवस्था आणि निष्ठेचे उदाहरण आहे,’असे पाटील म्हणाले.
माझ्यासारख्या मध्यमवर्गीय, साध्या मुलीचा पूर्णवेळ राजकारण्याची सहचारिणी म्हणून झालेला प्रवास मी या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकाश यांनी पक्षाला वाहून घेतल्यानंतर मी पुण्यात राहून मुलांकडे, कुटुंबाकडे लक्ष दिले. तेव्हाचे, तसेच पुढे दिल्लीतील वास्तव्यात ‘कमलसखी’ सारखे उपक्रम राबवताना आलेले अनुभव, अनुभूती या पुस्तकातून मांडल्या आहेत, असे प्राची जावडेकर म्हणाल्या.राजहंस यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले.