पुणे दि. १९ ऑक्टोबर, २०२५ : पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळेच्या वेदभवनाचा ३६ वा वर्धापनदिन प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील साजरा करण्यात येणार असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या दरम्यान करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळा वेदभवन येथे दि. २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या काळात संपन्न होणार आहे. यामध्ये चतुर्वेदांची पारायणे, ऋग्वेद संहिता स्वाहाकार, विविध देवता याग अशी धार्मिक अनुष्ठाने आणि सायंकाळी कीर्तने, प्रवचने असे कार्यक्रमांचे स्वरूप आहे.
वेदपाठशाळेच्या या कार्यक्रमांना सर्व नागरिकांनी उपस्थित राहून वेदमंत्र श्रवण करुन वेदांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत असे आवाहन या प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात वेद्भवनचे प्रधानाचार्य मोरेश्वर विनायक घैसास गुरुजी यांनी केले आहे.
रविवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी वेदध्वजारोहण होईल, यानंतर पुण्याहवाचनपूर्वक ऋग्वेद संहिता स्वाहाकारास प्रारंभ होईल. रोज सकाळी ७:३० ते १२:३० या वेळेत हे धार्मिक कार्यक्रम आणि प्रसाद असे स्वरूप असेल.
दि. २८ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या काळात डोंबिवलीमधील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. कैलासबुवा खरे यांचे सुश्राव्य कीर्तने सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहेत. ह.भ.प. कैलास बुवा खरे हे उत्तम शास्त्रीय संगीत गायक आहेत. दि. १ व २ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध प्रवचनकार व वेदशास्त्रांचे अभ्यासक श्री प्रणव गोखले यांची प्रवचने होणार आहेत.
वेदपाठशाळेचे संस्थापक वेदमहर्षी कै. विनायकभट्ट घैसास गुरुजी यांचा स्मृतीदिन (श्राद्ध) दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. सायंकाळी स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी या सर्व कार्यक्रमाची पूर्णाहुती सकाळी १०:३० वाजता होईल. दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वेदभवनात सायंकाळी ६:३० वाजता त्रिपुरारीचे पूजन करुन दीपोत्सव साजरा करण्यात येईल. याच दिवशी सायंकाळी ५:३० ते ८ या वेळेत प्रसिद्ध गायक व कीर्तनकार पंडित चारुदत्त आफळे यांचे नाट्यसंगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी या सर्व कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी
केले आहे.