पुणे : महाराष्ट्रातील ‘बळीराजा’चे यंदा अतिवृष्टीमुळे अपरिमीत नुकसान झाले जे लगेच भरून येणे शक्य नाही. अशा या अस्मानी संकटापुढे उद्ध्वस्त झालेला शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. त्यामुळे गुरुवार पेठेतील स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि पुणे मर्चंटस को ऑप बँकेच्या वतीने पूरग्रस्तांना १ हजार ५०० धान्य किट पाठविण्यात आले. तसेच पाथर्डी आणि बीड मध्ये त्याचे वितरण करण्यात आले.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मदतीचा ट्रक पाथर्डी आणि बीडकडे रवाना झाला होता. यावेळी ट्रस्टचे आणि बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे, बँकेचे उपाध्यक्ष सुधीर शेळके, अंकुश काकडे, रवींद्र रच्चा, हेमंत जगताप, योगीराज खिलारे, प्रसन्न जगताप, अजित खेसे, रावसाहेब खंडागळे, प्रदीप मिसाळ, उदय महाले, युवराज खेडकर, राजन उडाणे, हेमा खात्री, प्रमिला कोंढरे, प्रकाश पेटवे, ऍड. अभिजीत बोरकर, ऍड. शिरीष शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जगदाळे आदी उपस्थित होते. तसेच स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बीडमधील पूरग्रस्तांना १ हजार धान्य किट आणि पुणे मर्चंटस को ऑप बँकेच्या वतीने पाथर्डी येथे ५०० धान्य किट पाठविण्यात आले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला असून अशा परिस्थीतीत बळीराजाला संकटातून सावरणे हे आपले ‘सामाजिक’ कर्तव्य आहे. हीच भावना समोर ठेवत दोन्ही संस्थांकडून ही मदत देण्यात आली.
शेतकऱ्यांसाठी धान्यासह कोणत्या स्वरूपाची मदत दिली जात आहे, याची पाहणी अजित पवार यांनी केली. ऊन वारा पावसात राबणाऱ्या आणि जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी अडचणीत असताना पुण्यातून सहकारी बँकेतर्फे दिली जाणारी मदत अत्यंत महत्वाची असल्याचे पवार यांनी सांगितले. ‘शेतकरी बांधवांना – एका हात मदतीचा’ याअंतर्गत ही मदत दिली जात असून सामान्य नागरिकांचाही या उपक्रमात सक्रिय सहभाग असल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आले.
विजय ढेरे म्हणाले, शेती प्रधान असलेला आपला विशाल भारत देशाचा शेतकरी बांधव हा देशाचा मुख्य कणा आहे. मुळातच शेतकरी बांधव हा निसर्गाच्या तसेच बाजारामधील दर न मिळाल्यामुळे नेहमीच संकटात असतो. निसर्गावर अवलंबून असलेल्या या ‘बळीराजा’ वर आलेल्या संकटाला तोंड देण्याकरिता आम्हीही त्याच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत, असेही त्यांनी सांगितले.