प्रत्येक अडचणीचे निवारण गुरूचरित्रात डॉ. गजानन एकबोटे यांचे मत ; कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे श्री गुरू चरित्र ग्रंथ प्रकाशन : लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा १२६ वा दत्त जयंती सोहळा

तारां कित Avatar

पुणे : दैनंदिन जीवनात प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणींवर मात करण्याचा प्रय़त्न प्रत्येक व्यक्ती आपल्यापरीने करीत असतो. अशा अनेक अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य तुम्हाल गुरू चरित्रात मिळते. ज्ञान, कर्म आणि भक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या या ग्रंथात प्रत्येक अडचणीचे निवारण आहे, असे मत प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ. गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले.

बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे १२६ व्या वर्षी दत्त जयंती सोहळ्यांतर्गत महिलांसह सर्वांना पद्य स्वरूपात वाचता येईल असा पं. गजानन वासुदेव वाईकर रचित श्री गुरू चरित्र ग्रंथ प्रकाशन समारंभ मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री वासुदेव निवास प्रधान विश्वस्त डॉ. शरद जोशी, पं. गजानन वाईकर, प्रमुख जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रमोद बोंबटकर, गायिका सावनी रविंद्र, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात ख्यातनाम पार्श्वगायिका सावनी रविंद्र यांनी स्वरांकित केलेल्या प.पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज रचित श्री दत्तपदांचा ‘गुरू माझा मोक्षदाता’ या सांगीतिक ध्वनीफितीच प्रकाशन करण्यात आले. यावेळी सावनी रविंद्र यांनी दत्त महाराजांची करुणात्रिपदी गायली.

शरद जोशी म्हणाले, गुरू चरित्र हा एक राष्ट्रीय ग्रंथ आहे. जात, धर्म, पंथ या पलीकडे जावून या ग्रंथाचे भाषांतर अनेक भाषेत झाले आहे. आज फक्त महाराष्ट्रातच नाही तर विविध प्रांतात याचे पारायण केले जाते. गुरुचरित्र या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. कलियुगात संपूर्ण गुरू चरित्राचे पारायण हे अत्यंत कठीण आहे तरी देखील आज ते केले जात आहे. या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्त भक्तांच्या हृदयात आहे, असेही त्यांनी सांगितले.

अनंत गजानन वाईकर म्हणाले, गुरू चरित्र पारायणा बद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यातील एक म्हणजे स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे की नाही ह्या बाबतीत अनेकांचे मतभेद आहेत. परंतु गुरुचरित्रामध्ये ३१ व्या अध्यायात गृहस्थाश्रमात राहून महिलांनी कसे करावे वर्तन करावे याचा उल्लेख आहे. त्यामुळे महिलांना देखील गुरू चरित्राचे वाचन करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

Tagged in :

तारां कित Avatar