धार्मिक व्यासपीठावर अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घाला सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांचे मत ; कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्यांना अर्थ सहाय्य निधी प्रदान समारंभ

तारां कित Avatar

पुणे : सर्वसामान्य जनता भक्ती भावाने धार्मिक संस्थांना भरभरून मदत करीत असते. परंतु या संस्थांनी त्याचा उपयोग सत्कार्यासाठी करावा. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या धार्मिक व्यासपीठावर असाच उत्तम शैक्षणिक उपक्रम राबविला जात आहे. अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत सर्व धार्मिक संस्थांना देखील अशा प्रकारचे उपक्रम राबिवले पाहिजेत, असे मत सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी व्यक्त केले.

बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या १२६ व्या वर्षी दत्त जयंती सोहळ्यांतर्गत वेदभवन आणि दोन गरजू विद्यार्थ्यांना ‘विद्यार्थी अर्थ सहाय्य निधी’ मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी कोल्हापूरच्या डी.वाय.पाटील उद्योग समुहाचे अध्यक्ष डाॅ. संजय पाटील, विश्वेश्वर बँकेचे चेअरमन अनिल गाडवे, संचालक अजय डोईजड, वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनील रुकारी, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे, आदी उपस्थित होते.

वेदाचार्य मोरेश्वर घैसास म्हणाले, आज अनेक धार्मिक संस्थांमध्ये सत्कार्य केले जाते. परंतु तेथे वेदाचे ज्ञान असणारे व्यक्ती नसतात. प्रत्येक धार्मिक संस्थेत वेदाचे ज्ञान असणारा एक तरी व्यक्ती असावा. वेदपाठशाळांना काही सरकारी अनुदान नसते. त्यामुळे जसे आपण मंदिरामध्ये देणगी देतो, त्याचप्रमाणे वेदपाठ शाळांना देखील मदत करावी. समाजाच्या सहकार्यावर तेथील सर्व काम चालते, असेही त्यांनी सांगितले.

महेश सूर्यवंशी म्हणाले, अत्यंत प्राचीन आणि अध्यात्माचे स्थान असलेल्या या दत्त मंदिराच्या वतीने धार्मिकबरोबर अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात. असे अनेक उपक्रम राबवित या मंदिराने लक्ष्मीबाई यांच्या दातृत्वाची परंपरा राखली आहे, असेही त्यांनी सांगितले. अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले.

Tagged in :

तारां कित Avatar