दत्तजयंती उत्सवात दुमदुमला ‘ओम नमो भगवते रुद्राय…’ चा उद्घोष कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजित उत्सवात १०१ महिलांनी केले रुद्रपठण ; श्री गुरुदत्त दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन

तारां कित Avatar

पुणे : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिराच्या १२६ व्या वर्षी आयोजित दत्तजयंती उत्सवात “ओम नमो भगवते रुद्राय…” च्या उद्घोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच उत्सव मंडपात भगवान दत्तात्रयांच्या चांदीच्या मूर्तीवर अखंडपणे रुद्राभिषेक सुरु असताना हे मंत्रपठण महिलांनी केले.

सोहळ्यांतर्गत रुद्रपठण व रुद्राभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केशव शंखनाद पथकातील ५१ महिला व पुरुषांनी केलेल्या धीरगंभीर शंखनादाने परिसरातील वातावरण भारावून गेले. ट्रस्टचे विश्वस्त राजू व हेमलता बलकवडे, खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिक्षक सुनीता तिकोने, अपूर्वा लोहोटे यांनी रुद्राभिषेक केला. विद्या अंबरडेकर यांच्या नेतृत्वाखाली १०१ महिलांनी रुद्रपठण केले. अमोल मुळ्ये गुरुजी यांनी पौरोहित्य केले.

सायंकाळी ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार, माजी उपमहापौर दीपक मानकर, गणेश हिंगमिरे यांच्या हस्ते श्री गुरुदत्त दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच येथे झाले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, माजी नगरसेवक प्रविण चोरबेले यांसह अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, माजी अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी, सुनिल रुकारी, ॲड. शिवराज कदम जहागिरदार, उत्सव प्रमुख अक्षय हलवाई उपस्थित होते.

श्रीराम पवार म्हणाले, दत्तपरंपरा व्यवहारी जगाच्या पलीकडे जायला शिकविणारी परंपरा आहे. गेली १२६ वर्षे हे ट्रस्ट सातत्याने काम सुरु आहे. पूर्वीपेक्षा अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न विश्वस्त करीत आहेत. परमेश्वराची भक्ती व धार्मिक कार्य करतो, मात्र सामाजिक अंग जपणे देखील गरजेचे आहे.

दीपक मानकर म्हणाले, दत्तसंप्रदायात गुरु परंपरा जपली जाते. दत्तमंदिराचे योगदान हे मोठे असून केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक उत्तरदायित्व देखील जपले जाते. परमेश्वराप्रती आपला भाव हा जागृत असायला हवा. आचार व विचारांची शिकवण दत्त महाराजांकडून घ्यायला हवे.
ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले. यानंतर उदयोन्मुख युवा कलाकार विराज कदम जहागिरदार व सावनी सोमवंशी यांच्या भावभक्ती गायनाच्या बहारदार कार्यक्रमाने अवघे दत्तभक्त मंत्रमुग्ध झाले.

Tagged in :

तारां कित Avatar