पुणे, दि. २६ डिसेंबर: “शाळा ही ज्ञान मंदिर असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रोज नवनवीन गोष्टी शिकणे, नीटनेटकेपणा अंगीकारणे, वक्तशिरपणा आणि देश प्रेम असावे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आंतरिक उर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करावा.” असा सल्ला संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. दत्तात्रय तापकीर यांनी दिला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीच्या वतीने आयोजित केलेल्या वैश्विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा -२०२३ या राज्यस्तरीय प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी झालेल्या सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. संजीव सोनवणे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनेस्को अध्यासन प्रमुख, विश्वशांती केंद्र (आळंदी) चे संस्थापक अध्यक्ष व माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण व एमआयटी डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ.संजय उपाध्ये हे उपस्थित होते.
डॉ.दत्तात्रय तापकरी म्हणाले,”भारतीय संस्कृती ही सत्यमेव जयते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारावे, आपण खरच अभ्यास करतो का? जीवनात मूल्यांचे आचरण महत्वाचे आहे. आचरणामुळे समाजाचे भले होते. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याने त्यांनी प्रश्न विचारावे, संतांचा अभ्यास करावा आणि त्या ज्ञानाचा उपयोग पुढे जीवनासाठी करावा.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात नुसता विचार करून चालणार नाही तर त्याला कृतिशीलतेची जोड देणे गरजचे आहे. ज्ञानाच्या शोधात बुद्धांनी सर्वस्व त्याग केला ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावी. विद्यार्थीदशेत भगवद् गीता, स्वामी विवेकानंद, श्यामची आई, टाकीचे घाव या पुस्तकांचे वाचन करावे. जेणेकरून संघर्ष काय असतो हे कळेल. त्यातूनच जीवनाचा खरा शोध घेता येतो.”
प्रा.डॉ. संजीव सोनवणे म्हणाले,” नैतिक मूल्य सतत आपल्या कुटुंबात व अवती भवती वावरत असतात. त्याचा शोध घेऊन ते जीवनात उतरविल्यास व्यक्तीमत्व निर्माण होते आणि हे व्यक्तिमत्व आपल्या वर्तनातून दिसायला हवे.”
डॉ.संजय उपाध्ये म्हणाले,” वैश्विक मूल्याधिष्ठीत हा शब्द सोपा नसून समझणे अवघड आहे. आजच्या काळात संपूर्ण समाजालाच मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याची गरज आहे.”
डॉ. एस.एन. पठाण म्हणाले, ” शिक्षण म्हणजे साक्षर होणे नाही, तर यातून चारित्र्य व एक आदर्श व्यक्तिमत्त्व निर्मिती व्हावी. बुद्धी आणि शरीराच्या विकासाबरोबरच आत्म्याचा विकास घडविणे महत्वाचे आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी शिक्षण महत्वाचे आहेच परंतू देश एकत्रित राहण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण महत्वाचे आहे. तसेच या परिक्षेच्या उपक्रमामागची व विद्यार्थ्यांना सत्कारपूर्वक पारितोषिके देण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ”
सूत्रसंचालन प्रा.डॉ. अर्चना चौधरी यांनी केले. प्रा.एकनाथ सारूक यांनी आभार मानले.
जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी, पुणे
०००००००
बॉस
सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी राज रमेश पाखरे, संत ज्ञानेश्वर मा. विद्यालय, पुणे, यांनी सुवर्णपदक पटकावले त्याला रु. ११,०००/- रोख बक्षीस, स्मृतिचिह्न व प्रमाणपत्र देण्यात आले. रौप्यपदक माधव विठ्ठल मुंढे, कै. दादाराव कराड विद्यालय, नागझरी, रोख रु. ९,०००/- रक्कम, कास्यपदक अवनी दिपक साठे, संत ज्ञानेश्वर मा. विद्यालय,पुणे, पटकावले. त्यांना रु. ७०००/- रोख रक्कम दिले. तसेच चतुर्थ उत्तेजनार्थ वैष्णवी प्रकाश असवर, श्री शिवाजी विद्यालय, अकोट आणि पंचम उत्तेजनार्थ विरज सुधाकर वनेरे, कै. दादाराव कराड विद्यालय, नागझरी पटकावले आहे. त्यांना प्रत्येकी रु. ६०००/- व रु. ५०००/- रोख रक्कम देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा देऊन पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.