ललित लेखनापलीकडील ‘अश्वत्थाम्या’चे घडले दर्शन* डॉ. गौरी मोघे यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान रंगले जे

तारां कित Avatar

*

पुणे : दि. २७ – कथा-कादंबरी- नाटक-एकांकिका अशा ललित साहित्यकृतींमधून भेटलेल्या अश्वत्थामा या व्यक्तिरेखेचे, मूळ महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीतील नेमके रूप उलगडणाऱ्या डॉ. गौरी मोघे यांच्या व्याख्यानाने लाभसेटवार प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेला आज येथे सुरवात झाली.

डॉ. अनंत आणि स्नेहलता लाभसेटवार फाऊंडेशन आयोजित व्याख्यानमालेतील पहिले पुष्प ‘अश्वत्थामा’ या विषयावर महाभारत सांस्कृतिक सूची प्रकल्पाच्या कार्यकारी संपादक आणि भारतविद्या प्लॅटफार्मच्या कंटेंट क्यूरेटर डॉ. गौरी मोघे यांनी गुंफले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृहात झालेल्या या अभ्यासपूर्ण व्याख्यानाला जिज्ञासूंनी गर्दी केली होती. त्यामुळे उत्तरार्धात प्रश्नोत्तरेही रंगली.

‘लहानपणी भुकटी प्राशन करणारा, पुढे महायुद्धप्रसंगी द्रौपदीचे पाचही पुत्र, तसेच पांचाल शिबिरांचा विध्वंस करणारा, भळभळती जखम घेऊन तेल मागत फिरणारा, अशी अश्वत्थामा या व्यक्तिरेखेची एक समजूत जनमानसांत आहे, मात्र अश्वत्थामा या व्यक्तिरेखेचे ते मूळ स्वरूप नाही, असे स्पष्ट करून डॉ. मोघे म्हणाल्या, ‘पांचालराज द्रुपदाने आचार्य द्रोणांचा अपमान केला होता, हे वस्तुस्थितीला धरून आहे, मात्र गरिबीमुळे हे घ़डले आणि बालपणी दुधाऐवजी भुकटी प्यावी लागली, हे वस्तुस्थितीदर्शक नाही. अश्वत्थामा गुरुपुत्र असल्याने त्याच्याविषयी कौरवांसह पांडवांनाही आत्मीयता होती. अर्जुनाशी तर त्याची विशेष मैत्री होती. युधिष्ठिराने राजसूर्य यज्ञप्रसंगी अभ्यागतांची सर्व व्यवस्था अतिशय विश्वासाने अश्वत्थाम्यावर सोपवली होती, हे लक्षात घेता अश्वत्थामा आणि पांडवांचे वैर नव्हते, हे लक्षात येते. मात्र, परिस्थितीवशात आणि नियत काळानुसार अश्वत्थामा कौरवांकडून लढला, हेही समजून घेतले पाहिजे.

महाभारतकाळात घडवलेल्या महायुद्धाचा उद्देशच मुळी भारावतरण हा असल्याने आणि प्रत्येक महत्त्वाची व्यक्तिरेखा, हा देवतेचा अंश असल्याने, अश्वत्थामा या व्यक्तिरेखेकडे वेगळ्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. महाभारतानुसार, अश्वत्थामा हा रुद्र, यम, क्रोध आणि काम यांच्या उत्पत्तीचे मर्म आहे. त्यामुळे त्या त्या प्रसंगी अश्वत्थामा त्या मर्मानुसार कृती करताना महाभारतात दिसतो. वाहती जखम घेऊन तीन हजार वर्षे फिरत राहण्याचा शाप त्याला मिळतो, असेही अभ्यासकांनी म्हटले आहे. भारावतरण करण्यासाठीच रुद्र त्याच्यात प्रवेश करून पांचाल, द्रौपदीपुत्र आणि इतरांचा विनाश घडवून आणतात. युद्धाच्या शेवटी अश्वत्थामा ब्रह्मास्त्र सोडतो, ते रोखण्यासाठी अर्जुनही तेच अस्त्र सोडतो. पण कृष्णाच्या मध्यस्तीने अर्जुन ते मागे घेतो. अश्वत्थाम्याला अस्त्र मागे घेण्याचे प्रशिक्षण नसल्याने अखेरीस ते उत्तरेच्या गर्भावर सोडले जाते आणि तिचा मृत गर्भ कृष्ण आपल्या पुण्यसंचयाने जिवंत करतो, असे महाभारत सांगते, याचा उल्लेख डॉ. मोघे यांनी केला.

महाभारतातील अनेक व्यक्तिरेखा एकापेक्षा अधिक देवतांचा अंश आहेत. अश्वत्थामाही त्याला अपवाद नाही. तो धर्म, यम आणि रुद्राचा अंश आहे, असे महाभारतातील उपाख्याने स्पष्ट करतात. त्यामुळे अश्वत्थाम्याची व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी उपाख्याने, अन्य कथाभाग यांचेही संशोधन महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन डॉ. मोघे यांनी केले.

याप्रसंगी लाभसेटवार फाऊंडेशनचे डॉ. अनंत लाभसेटवार, भांडारकर संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, डॉ. प्रदीप आपटे, देवदेवेश्वर संस्थेचे विश्वस्त सुधीर पंडित उपस्थित होते. अदिती हर्षे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. स्नेहा सप्रे यांनी सूत्रसंचालन केले. मैथिली जोशी यांनी आभार मानले.

Tagged in :

तारां कित Avatar