पुणे : नव्या पिढीला भारतीय संस्कृती परंपरेची ओळख व्हावी आणि आपल्या पारंपरिक कलांचे जतन व्हावे, याउद्देशाने जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजिलेल्या ५ व्या कीर्तन महोत्सवाला न-हे येथील संस्थेच्या आवारात प्रारंभ झाला. संस्थेतर्फे यंदाचा कीर्तन महर्षी पुरस्कार ह.भ.प. प्रभाकर दादा महाराज बोधले यांना जाहीर करण्यात आला आहे.
कीर्तनाद्वारे शालेय विद्यार्थी, तरुणाई, पालक व नागरिकांच्या प्रबोधनाकरीता ५ वा कीर्तन महोत्सव न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह शिक्षक, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. चार दिवसीय कीर्तन महोत्सवात ह.भ.प. माऊली महाराज शेडगे, ह.भ.प. सुनील महाराज शिंदे, ह.भ.प. प्रभाकर दादा महाराज बोधले यांचे कीर्तन होणार आहे. कीर्तन महोत्सवाचा समारोप कीर्तन केसरी शिवशंभु व्याख्याते ह.भ.प. राजेंद्र महाराज येप्रे यांच्या कीर्तनाने गुरुवार, दिनांक ६ जून रोजी होणार आहे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, सर्व समाज ज्ञानवंत झाला पाहिजे, विचारी झाला पाहिजे, यादृष्टीने जाधवर इस्टिटयूटस् वेगवेगळ्या घटकांसाठी उपक्रम राबविते. भागवत धमार्ची पताका फडकवित राहिले पाहिजेत, याकरीता भक्ती व शक्तीचा मिलाप असलेला हा कीर्तन महोत्सव राबविण्यात येत आहे. कीर्तनातील विषयांतून सर्वांना आताच्या काळात प्रेरणा मिळेल, त्यामुळे सर्वांनी कीर्तनांचा आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.