महिलांचा सन्‍मान करणारी संस्‍कृतीच जगात सर्वश्रेष्‍ठ – जगविख्यात संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर यांचे मत : पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड जीवनगौरव पुरस्कार वितरण संत गोपाळबुवा महाराज पुर्ननिर्माण मंदिराचे उद्धाटन, राष्‍ट्रधर्मपुजक दादाराव कराड पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण

तारां कित Avatar

पुणे दि.०३ जून – येणारा काळ मातृशक्‍तीचा आहे, ज्‍या देशात महिलांना देवीच्‍या, आईच्‍या रुपात पाहिले जाते, महिलांचा सन्‍मान होतो त्‍याच देशाची संस्‍कृती जगात सर्वश्रेष्‍ठ ठरते. आईनेच अनेकांना घडवले, रामेश्‍वर गाव आदर्श होण्‍यामागे मातृशक्‍ती आहे तेव्‍हा मातृप्रधान संस्‍कृती टिकली पाहीजे. त्‍यागमुर्ती श्रीमती प्रयागअक्‍का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आलेल्‍या पंचकन्‍यांचे महत्‍व अनन्‍यसाधारण आहे असे प्रतिपादन संत वृत्‍तीचे थोर शास्‍त्रज्ञ जगप्रसिध्‍द संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे यांच्‍या वतीने लातूर तालुक्‍यातील मौजे रामेश्वर (रुई) येथे त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या आकराव्‍या पुण्यस्मरण स्मृतिदिनाचे औचित्य साधून पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्‍का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्‍कार वितरण सोहळा, संत गोपाळबुवा महाराज पुननिर्माण मंदिराचा शुभारंभ, शिवलिंगाची प्राणप्रतिष्‍ठापणा, कलशारोहण सोहळा, त्‍यागमुर्ती प्रयागअक्‍का कराड समाधी मंदिराचे उद्धाटन आणि थोर स्‍वातंत्र्य सेनानी राष्‍ट्रधर्मपुजक दादाराव साधू कराड यांच्‍या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण सोमवार ३ जून रोजी मोठया उत्‍साहाच्‍या आणि भक्‍तीमय वातावरणात पार पडला. या सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण डॉ. विजय भटकर बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी होते. मुर्तीप्रतिष्‍ठापणा व कलशारोहण पुरोहीत मिलींद राहूरकर पुणे यांनी व त्‍यांच्‍या सहकार्यांनी मंत्रोपचारांनी केला. या सर्व कार्यक्रमात विविध गावचे भजनी मंडळ सहभागी झाले होते. यात महिला भजनी मंडळांचा मोठा सहभाग होता.
ज्ञानविज्ञान आणि अध्‍यात्‍माचा समन्‍वय साधून आयुष्‍यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणार्‍या अयोध्या येथील श्री रामायणम धाम आश्रमाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व ज्ञान विज्ञान अध्यात्माचा प्रसार करणार्‍या विदूषी दीदी मॉ. मंदाकिनी श्रीराम किंकर, मुंबई येथील ज्येष्ठ प्रवचनकार व कीर्तनकार ह.भ.प.सौ. भगवतीताई सातारकर-दांडेकर, नेपाळ येथील थोर समाजसेविका श्रीमती मीरा महार्जन आणि थोर निष्ठावंत वारकरी व कवयित्री श्रीमती विजयाबाई गोविंद कदम आणि पुण्यातील थोर समाजसेविका श्रीमती मेधा सुरेश घैसास या पंचकन्यांना पूर्णब्रह्मायोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख एकवीस हजार रुपये असे पुरस्‍काराचे स्‍वरुप होते. या कार्यक्रमास झारखंड राज्‍यातील सरला-बिर्ला विद्यापीठाचे कुलगूरु डॉ. गोपाल पाठक, ह.भ.प. हरीहर महाराज दिवेगावकर, ह.भ.प. तुळशीराम कराड, प्रगतीशील शेतकरी काशीराम कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, एटीडी विद्यापीठीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश कराड, लातूर एमआटीचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड, डॉ. हनुमंत कराड, प्रा. डॉ. सुचित्रा नागरे, प्रा. डॉ. सुनिल कराड, प्रा. स्‍वाती चाटे, डाॅ.आदिती कराड, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, कमल राजेखाँ पटेल, ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर, सुदाम महाराज पानेगावकर, उध्‍दव बापू आपेगावकर, रतनलाल सोनाग्रा, भंते तिसावरो, बालासाहेब कराड, राजेश कराड यांच्‍यासह अनेक मान्‍यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
देशात लाखो खेडी आहेत, भारत देश प्रगत व्‍हावा याची सातत्‍याने चर्चा होते, जोपर्यंत खेडी सुधारत नाहीत तोपर्यंत भारत देश सुधारणार नाही असे महात्‍मा गांधी म्‍हणत होते. देशात नवे पर्व सुरु होत असून रामेश्‍वर हे छोटे गाव आज देशातील एक तिर्थक्षेत्र म्‍हणून उदयास आले आहे असे सांगून शास्त्रज्ञ विजय भटकर म्‍हणाले की, एकोप्याचा संदेश देण्यासाठी डॉ. विश्‍वनाथजी कराड यांनी प्रयाग अक्‍का कराड यांच्‍या संकल्‍पनेतील रामेश्वर गाव विकसीत केले आहे या गावचा आदर्श इतरांनी घेवून सामाजिक एकात्‍मता जोपासावी असे आवाहन केले.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, मानवता तीर्थ म्‍हणून रामेश्‍वर गावची देशभर ओळख निर्माण झाली आहे. रामेश्‍वर आणि परिसरात अनेक ठिकाणी यज्ञ कुंड मिळून आले, कधीकाळी हजारो वर्षापुर्वी यज्ञभूमी होती आज देवभूमी झाली आहे. “अक्कांची आठवण ही हदयस्पर्शी आहे. त्या शक्तीच्या स्त्रोत आहेत. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मुर्तीमंत प्रतिक त्यागमूर्ती अक्का आहेत. ईश्वर ही व्यक्ती नाही तर शक्ती आहे. रामेश्‍वर येथे मानव एकतेचे मोठे प्रतिक निर्माण केले गेले आहे. अक्कांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कारातील सर्वच पंचकन्‍यांचे कार्य महान आहे. श्रीमती मीरा महार्जन यांच्‍या सहकार्यातून नेपाळ येथे संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम आणि गौतम बुध्‍द यांच्‍या नावाने तब्‍बल १२० घरांचे बांधकाम करण्‍यात आले तर ग्रामीण भागातील कसलेही शिक्षण न घेता विजयाबाई कदम यांनी तयार केलेली रचना कवयत्री बहिणाबाईंची आठवण करुन देते असे बोलून दाखविले.
पुरस्‍कार प्राप्‍त पंचकन्‍यांचे अभिनंदन करुन यावेळी बोलताना झारखंड राज्‍यातील सरला-बिर्ला विद्यापीठाचे कुलगूरु डॉ. गोपाल पाठक म्‍हणाले की, प्रभू श्रीरामाच्‍या अगोदर जन्‍म देवून संस्‍कार केलेल्‍या त्‍यांच्‍या मातोश्री कौशल्‍या यांना प्रथम नमन करतो त्‍याप्रमाणे विश्‍वनाथजी कराड यांचे कार्य खुप मोठे असले तरी त्‍यांना घडविणा-या, त्‍यांचे पालनपोषण करणा-या त्‍यागमुर्ती प्रयागअक्‍कांना नमन करणे महत्‍वपुर्ण आहे. अपुर्ण शिक्षण पध्‍दतीला अध्‍यात्‍माची जोड देण्‍याचे काम विश्‍वनाथजी कराड यांनी केले आहे. त्‍यांच्‍या या कार्याची विश्‍वस्‍तरावर दखल घेतली जात असल्‍याचे बोलून दाखविले.
पुरस्‍कार प्राप्‍त हभप भगवतीताई दांडेकर-सातारकर यांनी रामेश्‍वर गाव भाग्‍यवान आहे, हरीदास दारात आहे असे सांगून बहीन असतानाही आई म्‍हणून प्रयागअक्‍कांनी अभिमानास्‍पद कार्य केले असल्‍याचे गौरवास्‍पद उदगार काढले. संपूर्ण तीर्थक्षेत्र म्‍हणून रामेश्‍वर निर्माण झाले असून या परिसराचे मंगल कुशल होवो हा संदेश घेवून मी आयोध्‍या नगरीहून आले असे सांगून दिदी मॉ मंदाकीनी म्‍हणाल्‍या की, विश्‍वनाथजी कराड या रत्‍नाला घडविणा-या अक्‍कांच्‍या नावाने मिळालेला पुरस्‍कार हा सन्‍मान नसून आशिर्वाद असल्‍याचे बोलून दाखविले. याप्रसंगी श्रीमती मीरा महार्जन आणि विजयाबाई कदम यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त करुन पुरस्‍कार मिळाल्‍याबद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त केली.
राहुल विश्‍वनाथ कराड म्‍हणाले की, महिला सशक्‍तीकरणाचा आजचा सोहळा आहे, मुल घडवितांना महिलांचा मोठा वाटा असून अक्‍कांनी आपल्‍या भावंडांना घडविण्‍यासाठी जे कार्य केले ते अलौकीक आहे. त्‍यांच्‍यामुळेच कुटूंब परिवाराच्‍या हातून अनेक कार्य घडून येत आहेत. अक्‍कांच्‍या आध्‍यात्मिक कार्याच्‍या प्रेरणेतून आ. रमेशअप्‍पा कराड यांनी अनेक गावातील महिला भजनी मंडळ यांना टाळ मृदंगाचे वाटप केले.
प्रा. डाॅ. मंगेश तु. कराड यांनी पुरस्‍कार वितरण व इतर विविध कार्यक्रमाची आपल्‍या प्रास्‍ताविकातून सविस्‍तर माहिती दिली.
डॉ. मिलींद पात्रे यांनी सुत्रसंचलन केले. डॉ. सुचित्रा नागरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास रामेश्‍वर आणि पंचक्रोशीतील भाविक भक्‍त, महिला पुरुष, विविध क्षेत्रातील मान्‍यवर उपस्थित होते.

Tagged in :

तारां कित Avatar