*
पुणे, दि. २७: माजी सैनिकांच्या मागण्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक दरबाराचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, तहसीलदार अजित कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सैनिक दरबारात वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, सेवारत, सेवानिवृत्त अधिकारी, सेवारत सैनिक, माजी सैनिक, विधवा पत्नी यांच्याकडून ५८ अर्ज प्राप्त झाले. सर्व अर्जावर चर्चा करून अर्जदारांचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या तर काही अर्ज तेथेच निकाली काढण्यात आले. याव्यतिरिक्त ७८ अर्ज संबंधित विभागाकडे पाठविण्याचे तसेच पाठपुरावा करण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी प्रत्येक तीन महिन्यातून एकदा सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात येईल व माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले.
0000