Monday, September 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedअन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन*

अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन*

 

 

पुणे दि. ४: राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव करण्यासाठी राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खरीप हंगाम सन २०२४ पीक स्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.

 

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफूल या ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

*पीक स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये:*

पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र राहीत. शुल्क सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये व आदिवासी गटासाठी १५० रुपये राहील.

 

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड केलेली असणे आवश्यक आहे.

 

पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

 

स्पर्धेत सहभागासाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा आणि बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी.

 

स्पर्धेत सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीक निहाय राज्य पातळीवर प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांक ४० हजार रुपये, तृतीय क्रमांक ३० हजार रुपये, जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक १० हजार रुपये, द्वितीय क्रमांक ७ हजार, तृतीय क्रमांक ५ हजार रुपये आणि तालुका पातळीवरील प्रथम क्रमांक ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ३ हजार तर तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये परितोषिक आहे.

 

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी राज्याच्या कृषी विभागाचे संकेतस्थळ- https://krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments