पुणे – बर्फाच्छादित शिखरांच्या मोहिमेत सहभागी होताना प्रत्येक सदस्याने तेथील भौगोलिक रचनांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे त्यामुळे या शिखरावर चढाई करताना सोपे होते असे माउंट कांचनगंगा व अन्नपूर्णा इत्यादी शिखरावर यशस्वी चढाई केलेले ज्येष्ठ गिर्यारोहक डॉक्टर सुमित मांदले यांनी सांगितले
स्वच्छंद गिर्यारोहण संस्थेतर्फे *माऊंट पोलोगोंगका (६,४०० मीटर्स) व माऊंट कुन (७०७७ मीटर्स) या दोन मोहिमा मध्ये सहभागी झालेल्या गिर्यारोहकांना डॉक्टर मांदले व सन १९९२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एव्हरेस्ट मोहिमेतील सदस्य डॉक्टर मिलिंद ढमढेरे यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. मोहिमेतील सदस्य नुकतेच पुण्याहून रवाना झाले.
पोलोगोंगका मोहिमेचे नेतृत्व अनिकेत कुलकर्णी हे करीत असून या मोहिमेत तृप्ती जोशी (उपनेत्या),क्षितिज तारकर, संदीप पाटील, चैतन्य सहस्रबुद्धे, केदार नरवाडकर, जितेन्द्र बंकापुरे हे सहभागी झाले आहेत. माऊंट कून या मोहिमेचे नेतृत्व अनिकेत कुलकर्णी करीत असून तृप्ती जोशी यांचाही या मोहिमेत सहभाग आहे.
माऊंट पोलोगोंगका हे लेह-लडाख प्रांतातील ट्सोकर तलावाजवळील ६,४०० मीटर उंचीचे हिमच्छादित शिखर असून. या शिखराचा बेस कॅम्प ४,९०० मीटर्स उंचीवर आहे. माऊंट कून हे ७ हजार ७७ मीटर्स उंचीचे कारगिल भागातील दुसरे सर्वोच्च शिखर असून चढाईच्या दृष्टींनी अवघड आहे.
स्वच्छंद संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अन्नपूर्णा शिखर बेस कॅम्प मोहिमेतील सदस्यांना यावेळी प्रमाणपत्रे देण्यात आली. स्वच्छंद संस्थेचे संस्थापक संचालक अनिल बोंडे यांनी आभार मानले. यावेळी चैतन्य सहस्रबुद्धे,
क्षितिज तारकर,अनिकेत कुलकर्णी,तृप्ती जोशी,
जितेन्द्र बंकापुरे, संदीप पाटील, अनिल बोंडे हे उपस्थित होते.


